अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :- सांस्कृतिक भारताचा प्रवाह वेदकाळापासून आला आहे. तर राजकीय भारताचा प्रवाह ब्रिटीशकाळापासून सुरु झाला आहे. गेल्या दोनशे वर्षांच्या इतिहासात जगात अनेक राष्ट्रांचा नकाशा बदलला. सोवियत युनियनची शकले झाली.
हिंदू जीवनपध्दतीतून निर्माण झालेल्या सांस्कृतिक मूल्यावरच आपला भारत आकाराला आला आहे. स्वातंत्र्यानंतर भारत एकसंघ राहिला याचे कारण भारताची सांस्कृतिक जडणघडण हेच आहे. आज जगभरात राष्ट्रवादाचा विचार पुढे येतो आहे, त्याचा संबंध सर्वसामान्यांच्या जीवनमरणाशी आहे.
भारतीय घटनाकारांना अभिप्रेत असलेली धर्मनिरपेक्षता ही संकल्पना राष्ट्रावादाशी निगडीत आहे, असे मत दैनिक तरूण भारतचे संपादक किरण शेलार यांनी व्यक्त केले. जनजाती (वनवासी) कल्याण आश्रम, नगर शाखा आयोजित कै.ग.म.मुळे स्मृती व्याख्यानमालेत ‘राष्ट्रवादी विचारासमोर असणारे राजनैतिक आव्हान’ विषयावर पाचवे पुष्प गुंफताना किरण शेलार बोलत होते.
या व्याख्यानमालेचे यंदा 11 वे वर्ष असून लॉकडाऊनमुळे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून यंदा व्याख्यानमाला होत आहे. प्रारंभी डॉ.निळकंठ गोपाळराव ठाकरे यांनी प्रास्ताविकात वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्याची माहिती दिली. केतन सोनटक्के यांनी स्वागत केले.
प्रा.मालुंजकर यांनी तरूण भारतचे संपादक किरण शेलार यांचा परिचय करून दिला. …..यांनी ‘हम करे राष्ट्र आराधन’ हे गीत सादर केले. शेलार म्हणाले की, मार्क्सने कामगारांच्या शोषणाला चेहरा दिला. आर्थिक विषमतेतून निर्माण झालेली वेदना व त्यातून पुढे आलेल्या विचारांनी जगभरातील तरूणांना आकर्षित केले.
मार्क्सच्या विचारांनी शोषितांचे प्रश्न ऐरणीवर आले, मात्र ते सुटले नाहीत. आताच्या काळात इस्लामी दहशतवाद जगाच्या शांततेसाठी धोका आहे. उदारमतवादी फ्रान्समध्ये भयानक परिस्थिती आहे. अमेरिकेत ट्रम्पनी दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी कठोर पावले उचलले.
भारतात अनेकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचा संबंध जर्मनीचा हुकुमशहा हिटलरशी जोडण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु फॅसिस्ट हिटलरच्या क्रूरतेचे समर्थन कधीच होवू शकत नाही. आपल्याकडे रोहिम वेमुला नावाच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यावर त्याला जातीय रंग दिला गेला.
केंद्रातील आताचे सरकार अनुसूचित जाती जमातीच्या विरोधात आहे असा विचार पसरवण्याचा प्रयत्न केला गेला. सरकारने देशात बेकायदेशीररित्या घुसलेल्या घुसखोरांना हाकलण्यासाठी सीएए कायदा केला. परंतु, या कायद्याच्या अंमलबजावणी आधीच सरकारच्या भूमिकेबाबत चुकीचे गैरसमज पसरवण्यात आले.
सगळ्याच अल्पसंख्याक मुस्लिमांना देशाबाहेर काढले जाईल असा समज पसरवण्यात आला. शेतकरी आंदोलनावरुनही सरकारविरोधात चुकीचा संदेश देण्यात आला. हा सर्व चकवा जाणूनबुजून निर्माण केला गेला.
पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी रशियन समाजवादाच्या प्रभावाखाली आपल्या सांस्कृतिक राष्ट्रवादाकडे दुर्लक्ष केले. इस्लामी घुसखोरीचा इतिहास नजरेआड करण्यात आला. तंटा नको म्हणून आपलीच भूमी सोडून जायची वेळ आपल्यावर आली.
तुष्टीकरण करीत धर्मांधांच्या वाढत्या उपद्रवाला लगाम घालायला कोणी तयार नाही. मूल्यांची ही गफलत शिक्षण क्षेत्रातही सुरु आहे. जेएनयुसारख्या विद्यापीठात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर केला जातो. अल्पसंख्याक शिक्षण संस्थांत कट्टर धार्मिकता रूजवली जात आहे.
काही कलाकारांचा समूहही इतरांचा आवाज दडपून वैचारिक दहशतवाद पसरवत असतो. त्यांच्याकडून पश्चिम बंगालमधील हिंसेचा साधा निषेधही व्यक्त केला जात नाही. बंगालमध्ये तृणमूल व मुसलमान यांच्या युतीची मोठी दहशत निर्माण झाली आहे. पुरस्कार वापसी करणारे या मुद्दयावर मूग गिळून आहेत.
आपल्या देशात आकारला येणार्या आंदोलनांना परदेशातून मिळणारी मदत चिंतेचा विषय आहे. शेतकरी आंदोलनावेळी खलिस्तानी विचारांचे लोक दिल्ली पोलिसांवर धावून गेले. भारताची प्रतिमा जगभरात मलिन करण्यासाठी माध्यमांचा वापर केला जातो.
या सर्व प्रकारांना तोंड देण्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे नेमके महत्त्व समजून घेतले पाहिजे. वस्तुस्थिती, तर्क व सादरीकरण या तिनही गोष्टींवर हुकुमत मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. एखाद्याच्या अजेंड्यावर सकारात्मक, नकारात्मक प्रतिक्रिया देणे म्हणजे आपणही त्यांच्या अजेंड्यात सहभागी होणे असे असते.
हिंदूच्या न्याय हक्कासाठी लढाई जिंकायची असेल तर तिचे स्वरुप तपशिलवार समजून घेतले पाहिजे. वैचारिक गोंधळ टाळला पाहिजे. तरूणांसाठी सहज अभिव्यक्त होता येईल अशी व्यासपीठे निर्माण होणे गरजेचे आहे, असे शेलार यांनी सांगितले.