अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- कोरोनाच्या कालावधीत पशुवैद्यकीय सेवा सुरूच होती. या संकटाच्या काळात जीव धोक्यात घालून सेवा बजावताना काही अधिकारी-कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू होऊन त्यांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत.
राज्यातील मृत पावलेल्या या पशुवैद्यकिय अधिकार्यांना शासनाने तात्काळ विमा कवचाला लाभ द्यावा. अशी मागणी पशुवैद्यकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली आहे.
त्याचबरोबर कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेत लसीकरणात प्राधान्य देऊन करोना योध्दे म्हणून सुविधा देण्याकरीता शासनाच्या सर्व बैठकांवर बहिष्कार टाकण्यात आला आहे.
याबाबत शासनाने तात्काळ दखल घेऊन प्रश्न न सोडविल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल अशा इशारा पशुवैद्यकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे. दरम्यान कोरोनाकाळात सेवा बजावत असताना राज्यात आतापर्यंत 49 पशुवैद्यकिय अधिकार्यांचा मृत्यू झाला आहे.
त्यांना शासनाने विमा कवच प्रदान करीत लाभ देणे आवश्यक होते. त्याच बरोबर प्राधान्याने लसीकरण आणि करोना उपचार मिळणे गरजेचे होते.
तथापी अशा कोणत्याही प्रकारे सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. संबंधितांना तात्काळ विमा कवच उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव सादर केला आहे.
त्यावरती राज्याचा निर्णय होण्याची प्रतिक्षा असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र आता याच मुद्द्यावरून पशुवैद्यकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.