अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2021 :- कोरोना महामारीचे संकट पुन्हा झपाट्याने वाढत चालले आहे. महामारीचा बिमोड करण्यासाठी आतापर्यंत जगभरात लसीचे ७८ कोटींहून अधिक डोस लोकांना देण्यात आले आहेत;
मात्र असे असले तरी कोरोनाचा शेवट इतक्यात होणार नाही, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) प्रमुख टेड्रोस अधोनाम घेब्रेयेसस यांनी दिला आहे.
तसेच आरोग्यासंबंधी कठोर उपाययोजना केल्यास काही महिन्यांत महामारीवर नियंत्रण मिळवता येण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.
जगभरात जानेवारी आणि फेब्रुवारीतील सलग सहा आठवड्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत कमालीची घट नोंदवण्यात आली होती; पण आता सलग सात आठवड्यांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येने उसळी घेतली आहे.
चार आठवड्यांपासून बळींच्या आकड्यांतदेखील चिंताजनक वाढ झाली असल्याचे घेब्रेयसस म्हणाले. गत एका आठवड्यात कोरोनाचे सर्वाधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. आशिया आणि पश्चिम आशियातील काही देशांमध्ये कोरोनाने रौद्ररूप धारण केल्याचे दिसून येत आहे.
या वाढत्या संकटाला रोखण्यासाठी जगभरात लसीकरणदेखील व्यापक पातळीवर सुरू आहे. आतापर्यंत जगात ७८ कोटींहून अधिक कोरोनारोधी लसीचे डोस लोकांना देण्यात आले आहेत.
कोरोनाविरोधातील लढाईत लस हे महत्त्वाचे शस्त्र आहे; पण त्याचवेळी सामाजिक अंतर राखणे, मास्क वापरणे, कोरोना चाचण्या, कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्या लोकांना शोधणे आणि क्वारंटाईन करणे, यांसारख्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत,
असे घेब्रेयसस म्हणाले. यावेळी त्यांनी कोरोनाने वाढत चाललेल्या युवकांच्या मृत्यूवरदेखील चिंता व्यक्त केली.