कर भरणाऱ्या नागरिकांना विकासापासून वंचित ठेवणाऱ्या कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी जनतेची माफी मागावी

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :-  मागील आठ महिन्यापूर्वीच जर त्यांनी शहरविकासाच्या बाबतीत हि भूमिका घेतली असती तर नागरिकांना खराब रस्त्यांचा त्रास सोसावा लागला नसता.२८ विकासकामांना विरोध करून जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी देवून देखील न्यायालयातून स्थगिती मिळवून त्यांनी शहरातील जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी केले आहे.

केलेल्या चुकीची उपरती त्यांना झाल्यामुळे त्यांनी न्यायालयीन लढाई थांबविण्याचा घेतलेला निर्णय हे उशिरा सुचलेलं शहाणपण असून कर भरणाऱ्या नागरिकांना विकासापासून वंचित ठेवल्याबद्दल शहरवासीयांची कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी माफी मागावी व दिलेला शब्द पाळून तातडीने विकासकामांना सुरुवात करावी असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना व मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. कोपरगाव येथील गौतम बँकेच्या सभागृहात राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना व मनसेच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी पत्रकारांशी संवाद साधतांना सर्वपक्षीय पदाधिकारी बोलत होते. यावेळी महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, हाजीमेहमूद सय्यद, शिवसेनेचे शहराध्यक्ष कलविंदरसिंग डडीयाळ, राजेंद्र वाकचौरे, राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष नवाज कुरेशी, दिनकर खरे, फकीरमामू कुरेशी, बाळासाहेब रुईकर,भरत मोरे,मनसेचे अनिल गायकवाड, रमेश गवळी, सचिन परदेशी, डॉ. तुषार गलांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पत्रकारांशी संवाद साधतांना राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले म्हणाले की, मागील आठ महिन्यापासून कोपरगाव शहरातील अतिशय महत्वाच्या २८ विकासकामांना पहिल्या स्थायी समितीच्या मिटिंगपासून कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी विरोध करून न्यायालयातून स्थगिती आणली. नागरिकांना रोष वाढत असल्याचे पाहून आमचा फक्त सहा कामांनाच विरोध होता अशी सारवासारव करून न्यायालयीन लढाई थांबविण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी जरी सांगितले असले तरी त्यांनी सर्वच २८ विकासकामांना विरोध केलेला आहे

हे कोपरगाव नगरपरिषदेकडे असलेल्या जनरल मिटींगच्या इतिवृतात नमूद करण्यात आलेले आहे. आमचा सहा कामांना विरोध आहे हे त्यांनी न्यायालयात देखील मांडले नाही व जनरल मिटिंगमध्ये देखील मांडले नसून कोल्हे गटाचे नगरसेवक हे खोटे बोलून नागरिकांची दिशाभूल करीत आहे. नगराध्यक्ष वहाडणे यांनी शहरविकासासाठी कोल्हे गटाच्या नगरसेवकांना शहरातील जनतेला वेठीस धरू नका, विकासकामे होवू द्या असे आवाहन आठ महिन्यापूर्वीच केले होते मात्र आठ महिन्यानंतर कोल्हे गटाच्या नगसेवकांना सुबुद्धी आली आणि त्यांनी न्यायालयीन लढाई थांबविण्याचा निर्णय जाहीर केला.

मात्र त्यांच्या नेत्याचा इतिहास पाहता कोल्हे गटाच्या नगरेसवकांनी पत्रकार परिषदेत दिलेला शब्द पाळावा अशी माफक अपेक्षा आहे. व मागील आठ महिन्यापासून नागरिकांना वेठीस धरून नागरिकांच्या जीवाशी खेळले त्याबद्दल कोल्हे गटाच्या नगसेवकांनी सर्वप्रथम नागरिकांची माफी मागावी असे आवाहन केले. समृद्धी महामार्गाच्या ठेकेदारास पाच नंबर साठवण तलावाचे काम करू न देण्यास कोणी दबाव आणला हे कोपरगावच्या जनतेने पाहिले आहे

याची आठवण करून देत पाच नंबर साठवण तलावाचे काम व्हावे यासाठी आ. आशुतोष काळे यांचा युद्धपातळीवर पाठपुरावा सुरु असून त्याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय येणार असल्याचे सुनील गंगुले यांनी सांगितले. गटनेते नगरसेवक विरेन बोरावके म्हणाले की, कोपरगाव नगरपरिषदेची निवडणूक पार पडल्यापासून आ. आशुतोष काळे यांनी शहरविकासासाठी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांना पाठींबा जाहीर करून त्यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्व नगरसेवक नेहमी विकासासोबत आहे.

जनरल मिटिंगनंतर देखील २८ विकासकामे होवू नये अशीच कोल्हे गटाच्या नगरसेवकांची भूमिका होती. ज्या ज्या वेळी या कामाबाबत बैठक घेण्यात आली त्या त्यावेळी त्यांनी विरोधच केला. जिल्हाधिकाऱ्यांकडे ज्यावेळी या विकासकामांचा विषय गेला त्यावेळी कोल्हेंनी वकील दिला कामे होवून नये म्हणून व आ. आशुतोष काळे यांनी वकील दिला विकासकामे व्हावे यासाठी. आमचे मार्गदर्शक आ. आशुतोष काळे यांची विकासाची प्रामाणिक भूमिका असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी विकासकामांना मंजुरी देखील दिली मात्र कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी इतिहास घडवून कामे होवू नये यासाठी न्यायालयात गेले.

न्यायालयात देखील विकास कामांना लवकरात मंजुरी मिळावी यासाठी आ. आशुतोष काळे यांनी वकील दिला यावरून जनतेला काय समजायचे ते समजले आहे. मात्र कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी शहरविकासाच्या बाबतीत जी भूमिका घेतली आहे त्या भूमिकेवर ठाम राहावे. नगरसेवक मंदार पहाडे म्हणाले की, राजकीय डावपेच खेळून जनतेला कोण वेठीस धरत आहे हे कोपरगावची जनता जाणून आहे. कोपरगाव शहरातील सर्वच रस्ते खराब झाले असून त्यावेळी कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी विकासकामांना मंजुरी दिली असती

तर नागरिकांना जो त्रास सहन करावा लागला नसता त्यामुळे मागील आठ महिन्यापासून नागरिकांना झालेल्या त्रासाबद्दल नागरिकांची माफी मागावी. शिवसेनेचे शहराध्यक्ष कलविंदरसिंग डडीयाळ म्हणाले की, शहराचा विकास झाला पाहिजे यावर शिवसेना ठाम असून आम्ही विकासासोबत आहे. कोल्हे गटाच्या नगरसेवकांना गणपतीबाप्पाने सदबुद्धी दिली. हि सदबुद्धी त्यांना आठ महिन्यापूर्वीच येणे गरजेचे होते. स्वत:च विरोध करून न्यायालयात जायचे आणि आता म्हणायचे की, हि कामे आम्हीच करणार असे सांगून कोल्हे गटाचे नगरसेवक आपल्याच हाताने आपली पाठ थोपटत असून त्यांनी करणी आणि कथनीमध्ये फरक ठेवून जनतेला जो शब्द दिला आहे

तो शब्द पाळावा कारण ते जे बोलतात ते करीत नाही हा आजपर्यंतचा इतिहास असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेनचे भरत मोरे म्हणाले की,नगराध्यक्षांनी पहिल्यापासून विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याची सर्व पक्षीय नगरसेवकांना आर्त हाक दिली होती. हि हाक दोन दिवसापुर्वीचीच कोल्हे गटाच्या नगरसेवकांना ऐकू आली का? याअगोदर तुमच्या कानात बोळे होते का?आजपर्यंत तुम्हाला नगराध्यक्षांची आर्त हाक ऐकू आली नाही का? असे प्रश्न उपस्थित करून

आजपर्यंत २८ विकासकामांना विरोध करणारेच आम्हीच विकासकामे करणार असल्याचे सांगत आहे. मात्र शहरातील जनता जाणून आहे की, विकास कामांना विरोध कोणी केला.आ. आशुतोष काळे यांचे शहरविकासाचे मोठे काम सुरु असून त्यांच्यासोबत शिवसेना, मनसे सोबत राहणार आहे. मनसेचे अनिल गायकवाड यांनी आम्ही नेहमी विकासासोबत राहणार असल्याचे सांगितले.

Ahmednagarlive24 Office