शेवगावचे ते लाचखोर पोलीस कर्मचारी अजूनही फरारच…उलटसुलट चर्चाना उधाण

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- लाच प्रकरणात सापडलेले शेवगाव उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंढे यांच्या विशेष पथकातील तीन कर्मचारी गेल्या अनेक दिवसांपासून अद्यापही फरारच आहे.

या लाचखोर पोलीस कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल झाला आहे. चोरट्यांचा शोध घेणाऱ्या पोलिसांना त्यांच्याच सहकारी लाचखोर पोलिसांना पकडण्यात एवढा वेळ का लागतो आहे? यामुळे आता पोलिसांच्या या तपास मोहिमेबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

दोन महिन्यांपूर्वी वाळूची वाहतूक करणारे एक वाहन उपअधीक्षक मुंढे यांच्या पथकातील वसंत कान्हु फुलमाळी, संदीप वसंत चव्हाण व कैलास नारायण पवार (रा. पाथर्डी) यांच्या पथकाने पकडले होते. हे वाहन कारवाई न करता सोडून

देण्यासाठी आणि पुढे हा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी या कर्मचार्‍यांनी वाळू व्यावसायिकाकडे 15 हजार रूपयांची मागणी केली होती.

याबाबत त्या व्यावसायिकाने नगरच्या लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती. लाच मागितली जात असल्याची पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली. त्यातून तक्रारीत तथ्य आढळून आले. लाच मागणीचा पुरावा एसीबीच्या अधिकार्‍यांना मिळाला.

त्यामुळे तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सदरचा गुन्हा दाखल होऊन दीड महिना झाला तरीही नगरच्या लाचलुचपत विभागाने या तीन पोलिसांना अटक केलेली नाही. अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, आरोपी सापडत नाही, असे उत्तर लाचलुचपत विभागाचे अधिकारी देतात.

या प्रकरणाबाबत लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने म्हणाले आमच्याकडे गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी पसार होतात. त्यांना न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर ते स्वत: हजर होत असतात.

अहमदनगर लाईव्ह 24