अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:- अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याच्या कारणावरुन सहा वर्षांपूर्वी तालुक्यातील मेंढवण येथे झालेल्या खूनाच्या घटनेतील मुख्य आरोपीवर गुन्हा सिद्ध झाला आहे.
सहा वर्ष चाललेल्या या खटल्यात आरोपी समीर चाँदभाई शेख याच्याविरोधात तालुका पोलिसांनी दाखल केलेले पुरावे व सरकारी पक्षाने केलेला युक्तीवाद ग्राह्य धरुन जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. वाय. भोसले यांनी त्याला दोषी धरतांना आजन्म कारावास आणि पन्नास हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
या प्रकरणात आरोपीचा भाऊ आणि फिर्यादीच्या पत्नीची मात्र सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. फिर्यादी चंद्रकांत सोपान बढे हा अनैतिक संबंधात अडथळा करतो या कारणावरुन आरोपी समीर चाँदभाई पठाण, अकबर चाँदभाई पठाण, व एक महिला (सर्व रा. मेंढवण, ता. संगमनेर) यांनी फिर्यादी चंद्रकांत सोपान बढे व त्याचा भाऊ सोमनाथ सोपान बढे यांना शिवीगाळ दमदाटी करुन समीर चाँदभाई पठाण याने सोमनाथ सोपान बढे यास चाकुने भोकसून ठार मारले.
संगमनेर तालुक्यातील मेंढवण येथे दि. 10 डिसेंबर 2014 रोजी ही घटना घडली होती. आरोपींविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. सदर गुन्ह्याचा तपास संगमनेर तालुका पोलीस निरीक्षक एस. डी. भामरे यांनी केला. तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
सदर खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश क्र. 2 श्री. भोसले याचे समोर झाली. याप्रकरणात मयताचा भाऊ, वैद्यकीय अधिकारी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व तपासणी अधिकारी यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या.
न्यायालयासमोर आलेला साक्षी-पुरावा, कागदोपत्री पुरावा तसेच अतिरिक्त सरकारी वकील संजय वाकचौरे यांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपी समीर चाँदभाई पठाण यास दोषी धरले व जन्मठेपेची शिक्षा सुनावली तर इतर दोन आरोपींना पुराव्याअभावी निर्दोष सोडण्यात आले.