अहमदनगर Live24 टीम, 9 एप्रिल 2021 :-सततच्या पावसाने शेतकऱ्यांचे कांदा बियाणे वाया गेले होते. त्यानंतर कांदा बियाणांचा तुटवडा निर्माण झाला होता.
त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी परजिल्ह्यातून बियाणे आणून कांदा लागवड केली व आता पीक हाताशी आलेले असताना राज्यात मिनी लॉकडाऊन करण्यात आला यामुळे बळीराजा पुन्हा एकदा हतबल झाला आहे.
वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विविध व्यवसायांवर कडक निर्बंध घातल्याचा फटका कांदा उत्पादकांना बसत आहे. कांद्याची मागणीच घटू लागल्याने भावही गडगडू लागले आहेत. उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
नाफेडमार्फत कांदा खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. जिल्ह्यातील बाजार समितींच्या आवारात कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे.
मात्र त्या प्रमाणात कांद्याला मागणी नसल्याने कमी भाव मिळत आहे. कोरोनामुळे सध्या हॉटेल व्यवसाय बंद आहेत तसेच परदेशातूनही कांद्याची मागणी कमी झाली आहे. त्याचा परिणाम दरावर होत आहे.
भाव गडगडल्याने काढलेला कांदा साठवणूक करण्यासाठी तालुक्यात केवळ २० टक्के शेतकऱ्यांकडे चाळी आहेत. मात्र बहुतांश शेतकऱ्यांकडे साठवण करण्याची सुविधा नसल्याने ते शेतकरी कांदा बाजार समितीत विक्रीसाठी घेऊन येत आहेत.
बियाणे, लागवड, औषध फवारणी, खत, काढणी, वाहतूक असा एकरी ४० ते ४५ हजार रुपये खर्च येतो. मात्र सद्य:स्थितीत केवळ चांगल्या कांद्याला ७०० ते ९०० रुपये क्विंटलचा दर मिळत आहे.