अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:-गोदावरी डाव्या-उजव्या कालव्याला दिनांक २१ फेब्रुवारी रोजी शेतीसह पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार असल्याची माहीती माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
परिसरातील शेतक-यांची आवर्तनाची मागणी लक्षात घेवून याबाबतचा पाठपुरावा आ.विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाकडे सुरु ठेवला होता. मागील काही दिवसांपासून सर्वच पिकांना पाण्याची आवश्यकता असल्यामुळे लाभधारक शेतकऱ्यांकडून आवर्तनाची मागणी होत होती.
या संदर्भात शेतक-यांनी, फळबाग उत्पादकांनी आ.विखे पाटील यांची भेट घेवून आवर्तन सोडण्याबाबतची मागणीही केली होती. या संदर्भात आ.विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या आधिका-यांशी चर्चा करुन कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरलेलेल्या नियोजनाप्रमाणे आवर्तनाची कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या होत्या.
त्यानुसार २१ फेब्रुवारी रोजी पिण्यासह शेतीसाठी आवर्तन सोडण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला असल्याचे आ.विखे पाटील यांनी सांगितले. सदर आवर्तन २१ फेब्रवारी ते मार्च अखेर पर्यंत सुरु राहणार आहे. उन्हाची तिव्रता भासू लागल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये म्हणून आधिका-यांनी योग्य ते नियोजन करुन,
या आवर्तनातून पिण्याच्या पाण्यासाठी गावपातळीवरील साठवण तलाव भरुन देण्यास प्राधान्य देण्याच्या सुचना आ.विखे पाटील यांनी दिल्या आहेत. शेवटच्या शेतक-याला पाणी मिळेल अशा पध्दतीने पाण्याचे नियोजन आणि काठकसर करण्याबाबतही आधिका-यांनी सजग राहण्याबाबत त्यांनी सांगितले आहे.