अहमदनगर Live24 टीम, 29 एप्रिल 2021 :- कोरोना महामारी,लॉकडाऊनमुळे दूधाचे दर निच्चांकी पातळीवर आल्याने दुध धंदा अत्यंत अडचणीत सापडला आहे.
यातून सावरण्यासाठी शासनाने दूध दरात वाढ करुन प्रती लिटर ३० रुपये प्रमाणे दूध खरेदी करावे किंवा प्रती लिटर ५ रुपये प्रमाणे दूध उत्पादकांना अनूदान द्यावे,अशी मागणी जिल्हा दूध फेडरेशनचे अध्यक्ष गणेश भांड यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
याबाबत माहिती देताना भांड यांनी सांगितले,कोरोना महामारीची महाभयकंर अशी दुसरी लाट आली. आणि बघता-बघता दूधाचे दर कोसळण्यास सुरुवात झाली.
लॉकडाऊननंतर ३२ रुपये लिटर वरुन दूधाचे दर २४ ते २५ रुपये प्रती लिटर वर आले आहेत. या मुळे दूध उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा मोठ्याप्रमाणात अडचणीत सापडला आहे.एकीकडे दूधाचे दर कमी होत असताना दुसरीकडे मात्र पशुखाद्याचे दर गगनाला भिडले आहेत.
११०० रुपया वरुन सरकी पेंड १८०० रुपयावर गेली आहे. हीच अवस्था वालीस व कांडी यांच्या दरात झाली असल्याने दूध उत्पादक मेटाकुटीला आला असून दूध व्यवसाय करणे अत्यंत जिकीरीचे झाले आहे.
या सर्व बाबीचा शासनाने गांभीर्याने विचार करुन ३० रुपये प्रति लिटरने दूध खरेदी करावे किंवा प्रति लिटर ५ रुपये प्रमाणे दूध उत्पादकांना त्वरीत अनूदान द्यावे अशी मागणी भांड यांनी केली आहे.