अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:- दुधाची डेअरी चालविणाऱ्या एका डेअरी चालकाने दूध उत्पादक शेतकर्यांना सुमारे आठ लाख रुपयांना गंडा घालून पसार झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान हा धक्कादायक प्रकार जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे घडला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, तालुक्यातील टाकळीमिया येथील एक दूध डेअरीचालक तांदुळवाडी, आरडगाव परिसरातील शेतकर्यांचे दूध खरेदी करून एका नामवंत दूध प्लॅन्टला वितरित करीत होता.
परंतु वैयक्तिक कारणांमुळे हा दूध डेअरीचालक गेल्या सहा महिन्यांपासून आर्थिक अडचणीत सापडला होता. काही देणीदारांची त्याच्याकडे देणीपण होती.
परंतु कोणताच मार्ग सापडत नसल्याने अखेर 5 जानेवारी 2021 रोजी संबंधित डेअरीचालकाने तांदुळवाडी -आरडगाव परिसरातून खरेदी केलेल्या शेतकर्यांच्या दुधाचे सुमारे आठ लाख रुपये पेमेंट स्वतः परस्पर काढून घेऊन पोबारा केला आहे. शेतकर्यांचे दूध संकलन अचानक बंद झाल्याने पेमेंट अडकलेल्या शेतकर्यांनी त्याचा शोध घेतला.
परंतु तो मिळून आला नाही. याबाबत संबंधित डेअरीचालकाच्या कुटुंबियांनी राहुरी पोलिसांत ती व्यक्ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली आहे.
तर शेतकर्यांनी देखील पेमेंटबाबत फसवणूक झाल्याची तक्रार दाखल करण्यासाठी राहुरी पोलिसात धाव घेतली. मात्र, त्यांची तक्रार दाखल न करता तुम्ही गोड बोलून त्यांच्याकडून पेमेंट काढून घ्या, असा सल्ला देण्यात आला आहे.