अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-बांधकाम व्यावसायिक असलेल्या युवकाची फसवणुक झाली असता, न्याय मिळण्याच्या भावनेने संभाजीराजे भोसले या युवकाने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेण्यासाठी औरंगाबाद ते राळेगण सिध्दी न्याय प्राप्ती संघर्ष यात्रा काढली आहे.
सदर युवक नगर शहरात दाखल झाला असता माध्यमांच्या प्रतिनिधी समोर आपल्या झालेल्या फसवणुकीची व्यथा मांडली. भोसले बोलताना म्हणाले की, माझे औरंगाबाद येथे बांधकाम व्यवसाय होते.
औरंगाबाद शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून समाजात वावरणार्या आठ व्यक्तींनी संगनमताने माझे व्यक्तिगत आयुष्य पूर्णत: उध्वस्त करुन टाकले आहे. लोकशाही मार्गाने न्याय मिळण्यासाठी प्रयत्न केला.
मात्र न्याय न मिळता निराशा आली. या प्रकरणात काही पोलीस अधिकारी देखील आरोपींना साथ देत आहेत. माझ्या बांधकाम कंपनीच्या आर्थिक फसवणूक प्रकरणातील सर्व आवश्यक पुरावे आर्थिक गुन्हे शाखा औरंगाबाद यांना सुपुर्द करण्यात आले.
मात्र यावर अद्यापि कारवाई करण्यात आलेली नाही. भाजपाचे माजी राज्यमंत्री यांच्या दबावामुळे पोलीस अधिकारी तपास करत नसल्याचे सांगून, पोलीस अधिकार्यांनी या प्रकरणी तपास अहवाल जाहीर करण्याची हिंमत दाखविण्याचे आवाहन केले आहे.
अशाच प्रकारे अनेक युवकांची फसवणुक झाली असून, या प्रकरणात न्याय मिळण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.