जिल्हाधिकाऱ्यांनी थेट पंतप्रधान मोदींसमोर मुख्यमंत्री ठाकरेंचे कौतुक केले आणि नंतर….

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल ११ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या राज्यातील ६० जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून संवाद साधला.

महाराष्ट्रातून बोलण्याची संधी मिळालेले अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांनी घेतलेल्या विविध निर्णयांमुळे करोनाशी लढा देण्यात यश येत असल्याचं डॉ. भोसले यांनी सांगितलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेचा जिल्ह्याला फायदा झाला. प्रशासन थेट ऑक्सिजन प्लांटपर्यंत पोहोचले. ग्रामपातळीवर सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, पोलीसपाटील या ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांशी थेट संवाद करण्यात आला.

रुग्णांना गृहविलगीकरणात न ठेवता कोविड सेंटरमध्ये ठेवले गेले, अशा अनेक बाबी भोसले यांनी सांगितल्या. या बैठकीनंतर स्वत: मुख्यमंत्री ठाकरे आणि मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनीही डॉ. भोसले यांना फोन करून त्यांचे कौतुक केले.

बैठकीत केंद्रीय आरोग्य सचिवांनी उत्तम ऑक्सिजन व्यवस्थापन आणि कोरोना नियंत्रणासाठी मुंबईत करण्यात आलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. ऑक्सिजनची उपलब्धता आणि वितरणाचे उत्तम व्यवस्थापन मुंबईत करण्यात आले, असे ते म्हणाले.

डॉ. भोसले यांनी जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती पंतप्रधानांना दिली. रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न, जिल्हा प्रशासनासह पोलीस, आरोग्य, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद तसेच इतर सर्व यंत्रणांच्या सहकार्य आणि समन्वयाने राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना,

जिल्ह्यातील करोनाच्या पहिल्या लाटेत केलेले प्रयत्न आणि दुसरी लाट थोपविण्यासाठी केलेल्या उपाययोजना आदींची माहिती त्यांनी दिली. मुख्यमंत्र्याच्या संकल्पनेतून आखलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या उपक्रमाची माहितीही त्यांनी दिली.

राज्य सरकारने सुरु केलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत मोठ्या प्रमाणात सर्वेक्षण करण्यात आल्याने करोना बाधित रुग्णांना शोधून त्यांच्यावर वेळेवर उपचार करणे शक्य झाले.

ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून केलेले प्रयत्न,  खासगी डॉक्टरांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधून त्यांना रुग्णांवर उपचार करण्यासाठी दिलेले प्रोत्साहन या गोष्टींचा डॉ. भोसले यांनी आर्वजून उल्लेख केला.

ग्रामीण भागात करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती देताना डॉ. भोसले यांनी आदर्शगाव हिवरे बाजारमध्ये राज्याच्या आदर्श गाव संकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी राबविलेल्या उपक्रमाची माहिती दिली.

ज्या पद्धतीने हिवरे बाजार करोनामुक्त झाले, तीच पद्धत इतर गावांत अवलंबण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यासह स्थानिक पातळीवरील इतर उपाययोजांनांची त्यांनी माहिती दिली. ही बैठक संपल्यानंतर स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, पालकसचिव आशीषकुमार सिंह यांच्यासह विविध मान्यवरांनी दूरध्वनी करुन डॉ. भोसले यांचे कौतुक केले.

आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी त्यांचे हिवरेबाजार गाव कोरोनामुक्त केले. जिल्हा प्रशासनाने त्यांचे अनुकरण करत त्यांचे अनुभव व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे इतर गावांतील सरपंच आणि ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविले, ही माहितीही जिल्हाधिकारी भोसले यांनी पंतप्रधानांना दिली.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24