अहमदनगर Live24 टीम, 19 जुलै 2021 :- प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन नुकतीच दहावी उत्तीर्ण झालेल्या उमाला कबड्डीची आंतरराष्ट्रीय खेळाडू व्हायचे होते मात्र सरपण गोळा करीत असताना विहिरीत पडलेल्या मुलीला (उमा उकिरडे) वाचविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या आईचा देखील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयदायक घटना घडली आहे.
घरातील स्वयंपाकासाठी शेतात जळाऊ लाकड आणण्यासाठी गेलेल्या मायलेकींचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना राशीन (ता. कर्जत) नजीक कानुगडेवाडी शिवारात शनिवारी (दि.१७) सकाळी घडली.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि राशीन येथील आशा राजू उकिरडे (वय४२) व उमा राजू उकिरडे (वय १६) या मायलेकी स्वयंपाकासाठी लाकडे आणण्यासाठी सकाळी साडेअकराच्या सुमारास शेतात गेल्या होत्या.
मात्र सायंकाळ झाली तरी त्या घरी न आल्याने पती राजू उकिरडे व शेजाऱ्यांनी त्यांचा परिसरात शोध घेतला. सायंकाळी उशिरा कानगुडवाडी शिवारातील संदीप कानगुडे यांच्या शेतातील विहिरीजवळ स्कार्फ स्कार्प व पांढऱ्या रंगाची दोरी दिसली.
त्यामुळे विहिरीत डोकावून पाहिले असता, आशा उकिरडे यांचा मृतदेह विहिरीत तरंगताना आढळला. शनिवारी मध्यरात्री आशा यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. मात्र उमाचा शोध लागत नव्हता. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली.
रविवार सकाळी उमाचा मृतदेह सापडला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी घटनास्थळी धाव घेतली.
तसेच पंचनामा केला. विहिरीजवळील कडुनिंबाच्या झाडाच्या वाळलेल्या फांद्या काढत असताना मुलीचा पाय घसरून ती विहिरीत पडली असावी व मुलीस वाचविण्यासाठी गेलेली आईही विहिरीत बुडाली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.