चालकाचे नियंत्रण सुटून ट्रॅव्हल खड्ड्यात जाऊन उलटली

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :- जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यातच अनेक अपघात बेशिस्त वाहन चालवल्यामुळे तर काही अपघात खड्ड्यांमुळे होतात. असाच एक अपघात संगमनेर तालुक्यात झाला आहे. चालकाचे नियंत्रण सुटून ट्रॅव्हल खड्ड्यात जाऊन उलटली.

या अपघातात ट्रॅव्हलचा क्लिनर आणि ट्रॅव्हलमधून प्रवास करणारे चार प्रवासी किरकोळ जखमी झाले. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. हा अपघात नाशिक-पुणे महामार्गावर नाशिककडे जाणाऱ्या रस्त्यावर संगमनेर तालुक्यात सायखिंडी शिवारात घडला.

याबाबत अधिक माहिती अशी कि, एक ट्रॅव्हल बोरीवलीहून (मुंबई) संगमनेर मार्गे शिर्डीला निघाली होती. चालक शिवदास आव्हाड यांचे ट्रॅव्हलवरील नियंत्रण सुटल्याने महामार्गावरून खाली उतरून ट्रॅव्हल खड्ड्यात जाऊन उलटली. अपघाताची माहिती मिळताच डोळासणे येथील महामार्ग पोलीस पथक मदतीसाठी हजर झाले.

हिवरगाव पावसा येथील टोल नाक्याच्या रुग्णवाहिकेतून जखमींना शहरातील खासगी रुग्णालयात उपचारार्थ पाठविण्यात आले. क्लिनर शंकर श्रीराम यांच्यावर उपचार सुरू आहेत.

ट्रॅव्हलमधून दहा ते बारा प्रवासी प्रवास करीत असल्याचे महामार्ग पोलिसांनी सांगितले. अपघातात किरकोळ जखमी झालेल्या इतर चार जणांची नावे समजू शकली नाहीत.