अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2021 :-देशात कोरोनाच्या संसर्गाची दुसरी लाट वेगाने पसरत असली तरी व्यापक पातळीवर लॉकडाऊन लावण्याची केंद्र सरकारची योजना नाही आहे.
आम्हाला अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प करायची नाही आहे. त्यामुळे गेल्यावर्षीप्रमाणे आता संपूर्ण देश लॉक होणार नाही, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे.
अर्थ मंत्रालयाने याबाबत ट्विट करत कोरोना विषाणूच्या साथीला रोखण्यासाठी पाच सुत्री रणनीती तपासणी, माहिती घेणे, उपचार करणे, लसीकरण आणि कोविड-१९ पसरण्यापासून रोखण्यासाठी देशात सुरू असलेल्या माहितीचे विवरण प्रसिद्ध केले आहे.
अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या, कोरोनाच्या साथीला रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर नियंत्रणासाठी विशेष पावले उचलली जातील. कोरोना रुग्णांच्या कुटुंबीयांना वेगळे ठेवण्याबाबत उपाय केले जातील.
स्थानिक पातळीवरील उपायांमधून संकटाचा सामना केला जाईल. मात्र लॉकडाऊन लावले जाणार नाही. देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने वाढली आहे. दुसऱ्या लाटेदरम्यान, अनेक राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णवाढीचा वेग प्रचंड वाढला आहे.
यामध्ये महाराष्ट्राबरोबरच छत्तीसगड, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश आहे. दरम्यान गेल्या २४ तासांत देशभरामध्ये कोरोनाचे १ लाख १४ हजार रुग्ण सापडले आहेत. तर मृतांची संख्याही एक हजाराच्या वर गेली आहे.