अहमदनगर Live24 टीम, 23 ऑक्टोबर 2021 :- सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आरोग्य सेवेतील गट बहुचर्चित ‘क’ संवर्गाची लेखी परीक्षा उद्या म्हणजेच रविवारी दि. २४ रोजी होत आहे. तर गट-ड साठी पुढील रविवारी दि. ३१ रोजी परीक्षा होणार आहे.
करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता वैद्यकीय सेवा अधिक सक्षम करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट-क व गड-ड सर्व रिक्त पदे भरण्यात येत आहे.
यासाठी घेण्यात येणारी परीक्षा विविध कारणामुळे यापूर्वी दोनदा रद्द करण्यात आलेली होती. आरोग्य विभागाच्या वतीने भरती प्रक्रियेत गट-क संवर्गाचे २ हजार ७३९ व गट-ड संवर्गाचे ३ हजार ४६६ पदे असे एकूण ६ हजार २०५ पदे भरली जाणार आहे.
आरोग्य विभागात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याने राज्यभरातून मोठ्या प्रमाणात परीक्षार्थींनी अर्ज केले आहेत.
दरम्यान नाशिक, जळगाव, नगर जिल्ह्यातील एकूण १४२ केंद्रावर उमेदवारांची बैठक व्यवस्था केली आहे. नाशिक परिमंडळात गट ‘क’ मधील ६८ हजार ६८६ उमेदवार परीक्षा देणार आहेत. अशी माहिती आरोग्य उपसंचालक डॉ.पी.डी. गांडाळ यांनी दिली.