अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :- करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना ५० हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला असून राज्य सरकारने त्या संदर्भातील जीआर काढला आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातलगांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. ही रक्कम राज्य आपत्ती निवारण निधीद्वारे दिली जाणार आहे.
ही मदत नातेवाईकांच्या थेट बँक खात्यात जमा केली जाणार आहे. राज्यात गेल्या दीड वर्षात करोनामुळे लाखो लोकं बाधित झाले आहेत तर मृत्यू झालेल्यांची संख्या देखील मोठी आहे. अनेक कुटुंबातील कर्त्या व्यक्तींचा मृत्यू झाल्याने या कुटुंबियांसमोर उदर निर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
अशा कुटुंबांना मदत करण्यासाठी आता राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.
महत्वाची कागदपत्र…
-अर्जदाराचा स्वतःचा तपशील, आधारक्रमांक किंवा आधार नोंदणी क्रमांक, अर्जदाराचा स्वतःचा बँक तपशील, मृत पावलेल्या व्यक्तीचा तपशील, मृत्यू प्रमाणपत्र. इतर निकट नातेवाईकांचे नाहरकत असल्याचे स्वयं घोषणापत्र.
– करोनामुळे व्यक्तीचा मृत्यू हा रुग्णालयात Clinical diagnosis च्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत झाला असल्यास अशा व्यक्तीचा मृत्यू करोनामुळे झाला समजण्यात येईल. जरी हा मृत्यू रुग्णालयाच्या बाहेर झाला असेल अथवा त्या व्यक्तीने करोनाचे निदान झाल्यामुळे आत्महत्या केली असेल तरीही ही मदत देणार आहे.
– करोनाबाधित व्यक्तीचा रुग्णालयामध्ये दाखल असताना मृत्यू रुग्णालयात झालेला असेल, जरी मृत्यू ३० दिवसांच्या नंतर झाला असेल तरी, अशा व्यक्तीचा मृत्यू देखील करोनाचा मृत्यू समजण्यात येईल.
– जी व्यक्ती करोनामुळे बरी झालेली नव्हती, अशा प्रकरणातील व्यक्तीचा मृत्यू रुग्णालयात किंवा घरामध्ये झालेला आहे. त्या व्यक्तीचा मृत्यू करोनाचा मृत्यू समजण्यात येईल.