अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:- महिला कंडक्टरला दमदाटी करत शिवीगाळ करणाऱ्या तिघांना जिल्हा न्यायाधीश पी. एन. राव यांनी एक महिना कारावासाची शिक्षा सुनावली.
अरविंद जाेसेफ कांबळे (२२, शहरटाकळी, ता. शेवगाव), बापू चंद्रभान चव्हाण (२७, शहरटाकळी, ता. शेवगाव) व समीर बबन सय्यद (२७, आत्रे, ता. शेवगाव) अशी आराेपींची नावे आहेत.
रिक्षामधील प्रवासी एसटीमध्ये घेतल्याचा राग आल्याने आराेपींनी महिला कंडक्टर प्रमिला पालवे यांना दमदाटी व शिवीगाळ केली. ही घटना १८ जून २०१४ रोजी भातकुडगाव शिवारात घडली हाेती.
याप्रकरणी पालवे यांच्या फियादीवरून शेवगाव पाेलिसांनी आराेपींच्या विराेधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला हाेता. सरकारी पक्षाच्या वतीने फिर्यादीसह इतर साक्षीदार तपासण्यात आले.
न्यायालयासमाेर आलेले साक्षीपुरावे, तसेच सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायाधीशांनी अाराेपींना एक महिना कारावासाची शिक्षा सुनावली.
सरकारी पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियाेक्ता जी. के. मुसळे यांनी काम पाहिले. सहायक फाैजदार ए. के. भाेसले यांनी सहकार्य केले.