अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2021 :- गेल्या काही काळापासून कोरोनाचे संकट देशासह राज्यावर घोंगावत आहे. यामुळे अनेक क्षेत्रांवर याचा मोठा परिणाम झाला. यातच कोरोनामुळे एसटी बसला देखील मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो आहे. आजही एसटी महामंडळाचे आर्थिक चाक गाळातच रुतलेले दिसून येत आहे.
डिझेल घेण्यासाठी एस. टी. महामंडळाकडे पैसेच नसल्यामुळे अनेक बसेस डेपोतच उभ्या करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याची तक्रार प्रवासी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रणजीत श्रीगोड यांनी केली आहे. याबाबत श्रीगोड यांनी परिवहन मंत्र्यांना निवेदन पाठविले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, करोनाचे सावट थोडेफार कमी झाल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी एस. टी. महामंडळाच्या आडमुठेपणामुळे नागरिक विशेषत: महिला वर्ग त्रस्त झाला आहे. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने प्रवाश्यांची संख्या जास्त असते.
बस प्रवास सुरक्षित असल्याने प्रवाशांचा कल बससेवेकडे असतो. मात्र आज स्थितीला केवळ बसला इंधन नसल्यामुळे अनेक बस डेपोतच उभ्या आहेत. बस नसल्यामुळे प्रवाशांची तर कुचंबणा होत आहे. इंधन नसल्याने बस चालक व वाहक यांनाही कामे राहिलेले नाहीत.
करोनामुळे बस बंद होती. त्यामुळे त्यांना कामही नव्हते. आता बस सुरू होऊन देखील केवळ चुकीच्या नियोजनामुळे बस डेपोतच उभ्या आहेत. या नुकसानीस जबाबदार कोण? एस. टी. महामंडळाच्या गलथान काराभारामुळे महामंडळासहीत सर्वच जण अडचणीत सापडले आहेत.