अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :- भारतातल्या पहिल्या कोरोना रुग्णाला पुन्हा कोरोना संसर्ग झाल्याचं आता समोर येत आहे. केरळमधली मेडिकल स्टुडंट असलेली महिला भारतातला कोरोनाचा पहिला रुग्ण ठरली होती.
तिला पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाल्याची माहिती केरळच्या आरोग्य विभागाकडून मिळत आहे. तिला पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. तिची आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आली आहे तर अँटिजेन चाचणी निगेटिव्ह आहे.
तिला सध्या कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत, अशी माहिती थ्रिसूरच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. आरोग्य अधिकारी पुढे म्हणाले की, तिला शिक्षणासाठी दिल्लीला जायचं होतं. म्हणून तिने आपल्या चाचण्या केल्या.
त्यात तिची आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तिची प्रकृती सध्या स्थिर असून ती सध्या होम क्वारंटाईन आहे. ३० जानेवारी २०२० रोजी वुहान विद्यापीठात शिकणारी एक तृतीय वर्षाची मेडिकलची विद्यार्थिनी कोरोनाबाधित आढळली होती.
ती जेव्हा आपल्या सुट्ट्यांसाठी भारतात परत आली, त्यावेळी तिचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आणि ती भारतातला कोरोनाची पहिली रुग्ण ठरली.
थ्रिसूरच्या वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात जवळपास तीन आठवडे उपचार घेतल्यानंतर दोनदा तिची चाचणी करण्यात आली. तिचा अहवाल निगेटिव्ह आहे याची खात्री झाल्यानंतर २० फेब्रुवारी २०२० ला तिला डिस्चार्ज देण्यात आला.