अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:-नगर शहरामध्ये सक्कर चौक ते जीपीओ चौकादरम्यान उड्डाणपुलाचे काम सुरु असून या कामामुळे वाहतूक कोंडी होत आहे.
दरम्यान शहरात सुरु होत असलेल्या उड्डाणपुलामुळे शहरातील वाहतुकीचा मोठा प्रश्न मार्गी लागणार आहे. परंतू, सध्या याच उड्डाणपुलाचे सुरु असलेले काम नगरकरांसाठी डोकेदुखी ठरत आहे. पुलाच्या कामामुळे शहरातील मुख्य रस्त्यावरून जाण्या येण्यास अडचण निर्माण होत आहे.
शहरातील अशोका हॉटेल झेंडीगेट ते सक्कर चौक दरम्यान सुरु असलेल्या उड्डाणपुलाचे काम चालु असून अशोका हॉटेल चौक ते स्टेट बँक चौकात पिलर स्टील फिटींगचे काम झाले असून काँक्रीट भरण्यास सुरवात देखील झाली आहे.
दरम्यान रस्त्यावर दुकाने व टपर्यांचे तसेच पथ विक्रेत्यांनी केलेले अतिक्रमणामुळे या भागात वाहतुकीची कोंडी होत आहे. यासाठी जिल्हा व मनपा प्रशासनाने तातडीने या भागातील रस्त्या लगतचे अतिक्रमणे काढणे आवश्यक आहे,
अशी मागणी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या नगर शाखेचे संस्थापक जवाहर मुथा यांनी केली. उड्डाणपुलाच्या कामामुळे कोठीपासून स्टेट बँक चौकापर्यंत रस्त्यात पत्रे लावल्याने वाहतुकीसाठी रस्ता अरुंद झाला आहे.
मात्र येणार्या जाणार्या वाहनांची संख्या वाढतच असल्याने त्याठिकाणी दिवसभर मोठ्याप्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे. कोठी चौक ते कोठला चौकापर्यंत वाहनांना जाण्यास 40 ते 50 मिनिटे लागत असल्याने नागरिकांना त्रास होत आहे.
जिल्हा प्रशासन, महानगरपालिका व राष्ट्रीय महामार्ग कार्यालय यांनी उड्डाणपुलाचा परिसर मोकळा करण्यासाठी, अतिक्रमणे काढण्यासाठी व वाहतुकीची कोंडी होवू नये यासाठी तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी मुथा यांनी केली आहे.