अहमदनगर Live24 टीम, 17 जुलै 2021 :- राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत दिवसेंदिवस भर पडत आहे. यातच कारवाईचा फास आवळला जात असल्याने आता त्यांची संपत्ती देखील जप्त केली जात आहे.
नुकतेच ईडीने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची 4 कोटी 20 लाखांची मालमत्ता जप्त केल्याची माहिती काल समोर आली होती. पण ईडीने जप्त केलेल्या मालमत्तेची किंमत ही 350 कोटी रुपये इतकी असल्याची नवी माहिती आता समोर आली आहे.
ईडीने शुक्रवारी अनिल देशमुख यांच्याशी संबंधीत दोन मालमत्ता जप्त केल्या आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांनी या मालमत्तेची किंमत 4 कोटी 20 लाख असल्याचं सांगितलं होतं. मात्र ही किंमत खरेदीची किंमत आहे.
या मालमत्तेची सध्याच्या बाजारभावानुसारची किंमत तब्बल 350 कोटी रुपयांच्या जवळपास आहे. देशमुख यांची कोट्यवधी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. ही कारवाई मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने केली आहे.
अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने ईडीने मनी लाँन्ड्रिगचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात ईडीने अनिल देशमुख यांना तीनदा चौकशीसाठी हजर राहण्याबाबत समन्स बजावले होते.
तर त्यांचा मुलगा ऋषिकेश याला एकदा समन्स बजावण्यात आलं होतं. मात्र, दोघेजण चौकशीसाठी हजर न राहता चौकशी टाळण्यासाठी सुप्रीम कोर्टात गेले आहेत. त्यानंतर ईडीने अनिल देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख यांनाही समन्स बजावलं होतं.
त्यांनी ही हजर न राहता आवश्यक ती कागदपत्रे ईडीला सादर केली आहेत. मुंबई आणि नागपूरमधील ही मालमत्ता असल्याची माहिती मिळत आहे. तसेच त्यांच्या पत्नी आरती देशमुख आणि प्रिमियर पोर्ट लिंक्स प्रायव्हेट लिमिटेडच्या संपत्तीचाही समावेश आहे.