अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2021:-नाशिक आणि उस्मानाबाद येथे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज सुरू करण्यात राज्य शासनाने परवानगी दिली असून त्याच धर्तीवर नगरलाही गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज सुरू करावे अशी मागणी माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी केली आहे.
नगरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झाले तर जिल्ह्यातील शासकीय आरोग्य यंत्रणाही अधिक सक्षम होवू शकते. क्षेत्रफळाने राज्यात सर्वात मोठा जिल्हा असूनही नगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयापासून वंचित आहे. पारनेरमध्येही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी स्थानिक आमदारांनी शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे.
नगर शहर जिल्ह्याचे मुख्यालय असूनही असा पाठपुरावा अद्याप झालेला दिसत नाही. त्यामुळे आता शिवसेना याप्रश्नात लक्ष घालून वरिष्ठ पातळीवर अर्ज, निवेदने देणार असल्याचे कळमकर यांनी सांगितले.
दरम्यान जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अहमदनगर शहरात जिल्हा रूग्णालयाशी संलग्न गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज सुरु करण्याची अनेक वर्षांची मागणी आहे.
विद्यमान पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीही सुरुवातीच्या काळात याचे सुतोवाच केले होते. दुर्देवाने दीड वर्षात या मागणीबाबत वरिष्ठ पातळीवर विचार झाला नाही.
दरम्यान नगरमध्ये गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज सुरू करण्यात यावी यासाठी कळमकर आता मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे.