अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :-समाजसेवेत नेहमीच पुढाकार घेणारे आणि नागरिकांच्या हक्कासाठी लढणारे गडाख कुटुंबीय आपण दिलेल्या शब्दाला देखील नक्कीच पाळतात याचेचएक उत्तम उदाहरण समोर आले आहे.
नेवासा तालुक्यातील गोधेगाव ग्रामस्थांना बोट उपलब्ध झाल्याने गोदावरी पात्रातील दळणवळण सुखकर झाले आहे. याबाबत निवडणुकीवेळी दिलेल्या आश्वासनाची मंत्री शंकरराव गडाख व प्रशांत गडाख यांनी वचनपूर्ती केली आहे.
गोधेगाव हे गोदावरी नदीपत्रालगतचे गाव आहे. श्री क्षेत्र देवगड व गोधेगाव या गावांच्यामध्ये बारामाही वाहणारी गोदावरी नदी आहे.
त्यामुळे श्री क्षेत्र देवगड येथून गोधेगाव येथे येणाऱ्या व गोधेगाव येथून श्री क्षेत्र देवगड येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना व दैनंदिन कामासाठी ये-जा करणाऱ्या नागरिक, शेतमजूर, शालेय विद्यार्थी यांना पाण्यामुळे प्रवरासंगम मार्गे जावे लागत होते.
त्यांना १० ते १२ किमी दूरवरून वळसा घालून जावे लागत होते. दरम्यान गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रशांत गडाख यांनी भेट दिली होती. त्यावेळी ग्रामस्थांनी गोधेगाव ते देवगड या नदीपात्रातील प्रवासासाठी बोट मिळावी, अशी मागणी केली होती.
या मागणीनुसार मंत्री शंकरराव गडाख व प्रशांत गडाख यांनी गोधेगाव ग्रामस्थांना लवकरात लवकर पाण्यातील प्रवासी बोट उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार जिल्हा परिषद सेस निधीमधून गोधेगावच्या ग्रामस्थांना बोट उपलब्ध करून दिली आहे.