अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:- अवघ्या पंधरा वर्षांच्या मुलीचे 22 वर्षांच्या तरूणासोबत लग्न लावून देत तिच्यावर संसार लादणार्या आई-वडिल, सासू- सासरे, पतीसह सात जणांविरूद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार व बालविवाह प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पिडीत मुलीनेच चाईल्ड लाईनच्या मदतीने फिर्याद दाखल केली आहे. जामखेड तालुक्यातील बालविवाहाचा एक प्रकार चाइल्ड लाइन संस्थेमुळेच उघडकीस आला आहे.
आधी आपली फसवणूक आणि आता छळ सुरू झाल्याचे लक्षात आल्यावर एका अल्पवयीन मुलीनेच चाइल्ड लाइनशी संपर्क साधला. तिच्या तक्रारीवरून नगरच्या तोफखाना पोलिस ठाण्यात दोन्ही बाजूंच्या लोकांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, नगर मधील अल्पवयीन मुलीचा विवाह जून 2020 मध्ये भिंगारमधील मुलाशी लावून दिला. विवाह लावण्यामध्ये सदर मुलीचे आई-वडिल, मुलीचे सासू-सासरेसह सात लोकांचा सहभाग होता. त्यावेळी लॉकडाऊन सुरू होता.
त्यामुळे गर्दी न जमविता साधेपणाने विवाह झाला. लग्नानंतर त्या मुलीला गर्भधारणा झाली. मात्र, सासरच्या मंडळींनी एवढ्यात मूल नको होते. त्यामुळे तिच्यावर गर्भपात करण्यासाठी दबाव सुरू झाला. शिवाय लग्नाआधी ठरल्याप्रमाणे तिला पुढील शिक्षण पूर्ण करायचे होते.
मात्र, लग्न झाल्यानंतर पती आणि सासरच्या मंडळींनी त्यासाठी विरोध केला. त्यावरूनह तिचा छळ सुरू झाला. पती मारहाण, शिवीगाळ, दमदाटी करत असल्याने पिडीत अल्पवयीन मुलीने नगरमधील चाईड लाईनशी संपर्क साधला. चाईड लाईनमधील अधिकार्यांनी पिडीताची बाजू समजून घेतली.
यानंतर तोफखाना पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली आहे. तिच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तिचे आई-वडील, पती, सासू-सासरे यांच्यासह सात जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे करीत आहेत.