मुलींनीच केले आईवर अंत्यसंस्कार…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- हिंदू समाजातील अंत्यसंस्काराच्या पद्धती गरूड पुराण प्रमाण मानून अवलंबल्या जातात. मृत व्यक्तीवर पुत्राने, तो नसेल तर पत्नीने, पत्नी नसेल तर भाऊ, दोघेही नसतील तर भावाच्या पुत्रांनी आणि कोणीच नसेल तर पुरोहिताने अंत्यसंस्कार करावेत, अस म्हटलंय.

यात पत्नीचा उल्लेख आहे. पण, नंतरच्या काळात स्त्रियांना अधिकाधिक दपडण्याच्या मानसिकतेमधून ते मागे पडलं असावं, चितेला अग्नी देणारा ती मृताचा वारस हे अप्रत्यक्षपणे सूचित करणेही यामुळे होत असणार.

असाच काहीसा प्रकार घडला आहे, बेलापूरमधील पवारवाडीत हिंदू धर्माप्रमाणे चालत आलेल्या सर्व रूढी-परंपरा मोडीत काढत आपल्या आईवर मुलींनी अंत्यसंस्कार केले आहेत. बबुबाई पवार (वय ८५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

आजींच्या पोटी मुलगा नसल्याने अंत्यसंस्कार विधी कोण पार पाडणार, असा एक पेच निर्माण झाला होता. मात्र, आजींच्या मुली वत्सला पवार, गोदाबाई हांडे, संजना गोपाळे, अंजना फापाळे, वनीता मते, मनीषा पाडेकर, संगीता बोडके, आशा नलावडे व नात जयश्री कानवडे यांनी जगा वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

आजींना खांदा देण्यापासून ते शेवटच्या विधीपर्यंत सर्व कार्यक्रम मुलींनी केले आहेत. काळानुसार पुरुषसत्ताक व्यवस्था अधिकाधिक घट्ट करणारी पुरुषांनी अंत्यसंस्कार करण्याची प्रथा बळकट होत गेली, पुत्राच्या हातून अंत्यसंस्कार झाले तर मोक्ष मिळवण्याची अतिरिक्त लालुचही असल्याने पोटी पुत्र असायलाच हवा, ही मानसिकता दृढ होत गेली.

अंत्यसंस्कार तर सोडाच पण हिंदू समाजातील वरच्या जातींमध्ये आजही महिलांना स्मशानात जायला परवानगी नाही. याउलट बहुजन समाजात आणि तथाकथित खालच्या जातींमध्ये बायका मृतदेहासोबत स्मशानात जातात. आजदेखील काही समाज कंटकांचा या सर्व गोष्टीला विरोध आहे.

एकीकडे आपण आपला देश किती प्रगत होत आहे, कसा महासत्तेकडे वाटचाल करत आहोत, हे सांगत आहोत आणि दुसरीकडचे नातेवाईक आणि भाऊबंद या मुलीने अंतिम संस्काराचे विधी करण्यास विरोध करत आहे.

कुठेतरी या सर्व जुन्या रूढी आणि परंपरांना आळा बसावा, यासाठी आजीच्या सर्व मुलींनी एक समाजासाठी आदर्श घालून दिला आहे. काळाच्या ओघात मुलगा म्हणजे म्हातारपणाची काठी हा समज खोटा ठरवत आपल्या आई-वडिलांची जबाबदारी प्रेमाने निभावणाऱ्या अनेक मुली आजूबाजुला दिसू लागल्या आहेतच.

पण त्यापुढचं पाऊल टाकत व समाजाचा विरोध होत असूनही या मुलींनी आपल्या आईच्या चितेला अग्नी देऊन समाजासमोर एक वेगळाच आदर्श उभा केला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24