शून्य आयात व जास्तीत जास्त निर्यात हेच आत्मनिर्भर भारताचे उद्दीष्ट : माधव भंडारी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :-  देश स्वतंत्र झाल्यानंतर आपण आपल्या आर्थिक धोरणांची समीक्षाच कधी केली नाही. नव्वदच्या दशकात जागतिक करारानुसार काही बदल करण्यात आले. पण आर्थिक धोरण आमूलाग्र बदलण्याचा प्रयत्न 70 वर्षात झाला नाही.

तो प्रयत्न पहिल्यांदा मोदी सरकारने केला आहे. याअंतर्गत केंद्राने अशी योजना मांडली की त्यात संपूर्ण देश, संपूर्ण समाज, संपूर्ण लोकसंख्या डोळ्यासमोर ठेवण्यात आली. यात गरीब कष्टकरी, शेतकर्‍याला मदत करण्यापासून ते मोठ्या उद्योजकापर्यंत सर्वांसाठीच तरतूद करण्यात आली आहे.

सर्वव्यापी आर्थिक योजना 70 वर्षात प्रथमच मांडली गेली. शून्य आयात व जास्तीत जास्त निर्यात हेच आत्मनिर्भर भारताचे उद्दीष्ट असून वैभवसंपन्न भारताचे बिजारोपण यात आहे, असे मत भाजपचे नेते तथा मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी मांडले.

जनजाती (वनवासी) कल्याण आश्रम, नगर शाखा आयोजित कै.ग.म.मुळे स्मृती व्याख्यानमालेत ‘आत्मनिर्भर भारताची संकल्पना’ विषयावर तिसरे पुष्प गुंफताना भंडारी बोलत होते. या व्याख्यानमालेचे यंदा 11 वे वर्ष असून लॉकडाऊनमुळे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून यंदा व्याख्यानमाला होत आहे.

प्रारंभी श्रीमती संध्या देवभानकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. चंद्रशेखर कुलकर्णी यांनी सादर केलेल्या भारताच्या महारथा या सारे मिळून ओढूया.. या गीताने व्याख्यानाची सुरुवात झाली. माधव भंडारी म्हणाले की, करोना महामारीमुळे गेल्या वर्षी लॉकडाउन लावावा लागला आणि अर्थकारण ठप्प झाले.

आपल्या देशासह जगातील विविध देशांच्या अर्थव्यवस्थेला दणका बसला. यातून सावरण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत पॅकेजची घोषणा केली. 12 मे 2020 रोजी 20 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले.

गेल्या वर्षी ऑक्टोबरपर्यंत त्यात वाढ होवून ते 27 लाख कोटी रुपयांचे पॅकेज बनले. हा आकडा आपल्या जीडीपीच्या एकूण दहा टक्के आहे. यातून पंतप्रधान मोदींनी देशासमोर एक संकल्प ठेवला. करोनाचे संकट तर भीषण होतच. पण या संकटाचे रुपांतर संधी करायचा प्रयत्न आहे. त्याचे चांगले परिणाम आता दिसायला लागलेत.

उद्योग, शेती क्षेत्रात सकारात्मक बदलांना सुरुवात झाली आहे. मध्यम व लघु उद्योगांसाठी नवीन धोरण स्विकारले. कारण या क्षेत्रात जवळजवळ 30 टक्के रोजगार आहे. बंद पडलेले उद्योग सुरु होत आहेत. संरक्षण क्षेत्रातील वेगवेगळी उत्पादने आपण आयात करायचो. तब्बल 108 उत्पादने देशातच तयार व्हावीत हा निर्णय घेतला.

त्यामुळे देशात हजारो नवीन उद्योग, रोजगारनिर्मिती झाली आहे. इंधनाबाबतही असाच निर्णय घेण्यात आला आहे. क्रूड ऑईलची आयात करून स्वत:चे जैविक इंधन तयार करण्यावर भर देण्यात येत आहे. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान, नवनवीन अवजारे यांचा वापर वाढविण्यावर भर दिलेला आहे.

या संकल्पनेच्या मागे सव्वाशे वर्षाच्या आर्थिक चिंतनाचा आधार आहे. लोकमान्य टिळकांनीही स्वदेशीचा नारा देता आर्थिक स्वयंपूर्णतेची संकल्पना मांडली होती. त्यांनी पैसा फंड उभारुन त्याकाळी उद्योग उभे करण्यास प्रोत्साहन दिले.

तोच दृष्टीकोन पुढे महात्मा गांधींनी ग्रामोद्योगातून मांडला. परंतु, स्वतंत्र भारताच्या राज्यकर्त्यांनी या विचाराकडे दुर्लक्ष केले. पंडित दिनदयाळ उपाध्याय यांनी मात्र हा धागा पुढे नेत ग्रामीण भागावर आधारित विकेंद्रीत अर्थव्यवस्थेचा पुरस्कार केला.

गावातच रोजगार, उद्योगाला चालना देवून त्याचे शहरातील स्थलांतर थांबवणे व साधनसंपत्तीची निर्मिती गावातच व्हावी हा विचार दिनदयाळ उपाध्याय यांनी मांडला. आजपर्यंत दुर्लक्षित असलेल्या मासेमारी या क्षेत्रालाही केंद्र सरकारने बळ देण्याचे ठरवले आहे.

आत्मनिर्भर भारत पॅकेजचा 30 टक्के वाटा महिला सक्षमीकरणासाठी आहे. करोनाकाळात जगातून सुटे भाग येणे बंद झाले. चीनमधून सर्वाधिक सुटे भाग जगात वितरित होतात. त्याचा फटका आपल्याकडील उद्योगांना बसला.

भविष्यात अशी वेळ पुन्हा येवू नये, जगाचे व्यवहार थांबले म्हणून आपले व्यवहार थांबता कामा नये या विचारातून आत्मनिर्भर भारत संकल्पना प्रत्यक्षात आणली जात आहे.

यातूनच जो भारत उभा राहिल तो पूर्णपणे स्वत:च्या सामर्थ्यावर उभा असलेला भारत असेल. शेवटी पसायदानाने व्याख्यानाची सांगता झाली.

अहमदनगर लाईव्ह 24