सुखद बातमी : देशातील दैनंदिन रुग्णसंख्येत तब्बल इतकी घट

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- देशात सलग आठव्या दिवशी कोरोनाच्या नव्या रुग्णवाढीचा आकडा एक लाखाहून कमी असून ७५ दिवसांनंतर सर्वात कमी ६०,४७१ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यापूर्वी ३० मार्च रोजी देशात ५३,२३७ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती.

गत २४ तासांत १.१७ लाख जण कोरोनामुक्त झाले तर २,७२६ जणांचा मृत्यू झाला. ७ मे रोजी देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळल्यानंतर आता दैनंदिन रुग्णसंख्येत तब्बल ८५ टक्के घट झाली असून अधिक संसर्गजन्य असलेल्या कोरोनाच्या ‘डेल्टा’ स्वरूपाबाबत सध्याला चिंतेचे कारण नसल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले.

मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, गत २४ तासांत कोरोनाचे ६०,४७१ नवे रुग्ण आढळल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या वाढून २ कोटी ९५ लाख ७० हजार ८८१ इतकी झाली आहे. या कालावधीत २,७२६ जण दगावल्याने बळींचा आकडा वाढून ३,७७,०३१ झाला आहे.

देशात सद्य:स्थितीत ९,१३,३७८ जणांवर उपचार सुरू आहेत. एकूण रुग्णसंख्येपैकी हे प्रमाण ३.०९ टक्के आहे. कोरोनामुक्त झालेल्या लोकांची संख्या सलग ३३ व्या दिवशी नवीन रुग्णसंख्येपेक्षा अधिक आहे. दिवसभरात १ लाख १७ हजार २३२ जण बरे झाल्याने कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या वाढून २,८२,८०,४७२ झाली आहे.

देशातील कोरोना संक्रमण दर ३.४५ टक्के झाला असून तो गत ८ दिवसांपासून ५ टक्क्यांखाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.६४ टक्के आहे. तर राष्ट्रीय मृत्यूदर वाढून १.२८ टक्के झाला आहे. देशात आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लसीचे एकूण २५ कोटी ९० लाख ४४ हजार ७२ डोस देण्यात आले आहेत.

मंत्रालयानुसार ७ मे रोजी देशात कोरोनाचे सर्वाधिक ४,१४,२८० रुग्ण आढळले होते. त्यानंतर आता दैनंदिन रुग्णसंख्येत तब्बल ८५ टक्के घट झाली आहे. २० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ५ हजारांपेक्षा कमी आहे.

अहमदनगर लाईव्ह 24