अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:-गुंड गजा मारणेविरोधात पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. वारजे पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मारणेला अटक करण्यासाठी पोलिसांची पथके कार्यरत झाली आहेत.
मारणे आणि त्याच्या साथीदारांच्या घरांची झाडाझडती घेण्यात आली आहे. यानंतर तो अटकेच्या भीतीने फरार झाल्याचे जाहीर करण्यात आले.
तर दुसरीकडे त्याच्या स्थावर व जंगम मालमत्तांवर टाच आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून मालमत्ता जप्तीचा जाहिरनामा काढण्याची कार्यवाही सुरू आहे.
त्याच्या साथीदारांवरही अशाच प्रकारे कार्यवाही करण्यात येत आहे. वारजे पोलिस ठाण्यात गजा मारणेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये मारणे याने साथीदारांसह चांदणी चौकात गैरकायद्याची मंडळी जमवली.
तसेच गस्तीवरील पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी कोविड १९ च्या अनुषंगाने परवानगी घेतली का अशी विचारणा केल्यावर आरोपी संतोष शेलार याने वाहनातून हात बाहेर काढून सहायक पोलिस निरीक्षकास ढकलून दिले, असे म्हटले आहे.
यात जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचेही कलम लावण्यात आले आहे. या गुन्ह्यात गजा मारणेसह दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.