अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :- सत्तेसाठी एकमेकांना वाचवण्याचा समान कार्यक्रम महाविकास आघाडी सरकारमध्ये सुरू आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्थेबरोबरच सामान्य माणसांचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत.
घरात बसून केलेला कारभार चव्हाट्यावर येण्याची भीती असल्यानेच सरकार अधिवेशनात चर्चेपासून पळ काढत असल्याचा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे यांनी केला.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदार विखे यांनी माध्यमांशी संवाद साधला. सरकार अधिवेशन घेण्याच्याच मानसिकतेत नाही. महाविकास आघाडी सरकारने मागील वर्षभरात केवळ घरात बसून केलेला कारभार जनतेने उघड्या डोळ्यांनी पाहिला आहे.
त्यामुळे सामान्य माणसांच्या प्रश्नांवर चर्चा व्हावी ही सरकारची इच्छा नाही. याकडे लक्ष वेधून कोविड संकटात राज्यातील जनतेची महाविकास आघाडी सरकारने हेळसांड केली.
कोविड संकटात महाविकास आघाडी सरकारकडून राज्यातील जनतेला दिलासा मिळू शकलेला नाही ही वस्तुस्थिती टाळण्यासाठी सरकार या मुद्द्यावर सभागृहात चर्चाच होऊ देत नसल्याचे विखे यावेळी म्हणाले.
शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली असली तरी, बहुतांशी शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत. नैसर्गिक आपत्ती आणि अतिवृष्टीत मदतीच्या केवळ घोषणा झाल्या, पुरेशी मदतही हे सरकार शेतकऱ्यांना करू शकले नाही.
आणि आता धाक-दडपशाहीने ग्रामीण भागातील वीज जोडणी तोडण्याचा प्रताप या सरकारचा सुरू आहे. महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत. तसेच मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी वेळोवेळी विविध विभागात भरतीच्या घोषणा केल्या.
परंतु एकाही विभागात नोकरभरतीची प्रक्रिया सुरू नसल्याने तरुणांमध्ये नैराश्याचे वातावरण आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दाही न्यायालयीन प्रक्रियेच्या नावाखाली सरकारने दुर्लक्षित केला आहे.
या सर्व प्रश्नांची चर्चा टाळण्यासाठीच सरकार जास्त कालावधीचे अधिवेशन घेण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप आमदार विखे यांनी केला.