कोरोनाने विधवा झालेल्या माता भगिनींसाठी शासनाने विशेष अर्थसहाय्य योजना अंमलात आणावी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- कोरोनाने विधवा झालेल्या माता भगिनींसाठी शासनाने विशेष अर्थसहाय्य योजना अंमलात आणावी अशी विनंती आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे साहेब यांना ई-मेल द्वारे पाठविलेल्या निवेदनात केली आहे.

ढुस यांनी पाठविलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, कोरोना महामारी मुळे मृत्यू पावलेल्या कुटुंबातील सदस्यांना राज्य सरकार विविध प्रकारची मदत करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी नुकतीच एक योजना जाहीर करण्यात आली.

परंतु त्यामध्ये कोरोनामुळे विधवा झालेल्या माता भगिनींसाठी कोणतीही विशेष तरतूद करण्यात आली नाही. विधवांसाठी असलेल्या जुन्या योजनांचा कोरोना काळात मृत्यू झालेल्या व्यक्तींना लाभ घेणेसाठी अनेक अडथळे पार करावे लागत असल्याने कोरोना काळात विधवा झालेल्या महिलांसाठी शासनाने विशेष अशी स्वतंत्र योजना कार्यान्वित करणे गरजेचे आहे.

शासन निर्णयातील काही जाचक अटींमुळे शासनाच्या जुन्या योजनेतील मदत तळागाळातील सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहचत नाही. उदाहरणार्थ – संजय गांधी निराधार योजनेमध्ये विधवा, परितक्त्या, अपंग, दुर्धर आजार, घटस्फोटिता यांना लाभ दिला जातो.

परंतु त्यांचे अपत्य २५ वर्षे वयाची झाल्यावर त्यांचा लाभ बंद होतो. श्रावणबाळ योजनेमध्ये ६५ वर्ष्यावरील लाभार्थींना मुले सांभाळत नाहीत. मुले स्वतंत्र राहतात, तसेच मुलांचे एकत्रित उत्पन्न जास्त येत असल्यामुळे मदत देता येत नाही.

राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेमध्ये दारिद्रय रेषेमध्ये नाव असेल त्याच लाभार्थ्यांना लाभ दिला जातो. संजय गांधी, श्रावणबाळ, इंदिरा गांधी या योजनांमधील उत्पन्नाची व सज्ञान मुलांची अट वगळून टाकावी.

तसेच सध्या राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेचा लाभ १८ ते ५९ या वयोगटातील दारिद्रय रेषेतील नाव असणाऱ्या व्यक्तींनाच दिला जातो. परंतु १८ ते ५९ या वयोगटातील दारिद्रय रेषेत नाव नसणाऱ्या व्यक्तींना दिला जात नाही.

त्यांना देखील मदतीची आवश्यकता असते. सदरची दारिद्र्य रेषेची अट रद्द झाल्यास राहिलेल्या गोरगरीब लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देता येईल. या योजनांसाठी गोरगरीब जनता अर्ज विनंत्या करीत आहेत.

तरी या जाचक अटी शिथिल झाल्यास पात्र लाभार्थ्यांना लाभ देता येईल. सबब कोरोना महामारीमध्ये विधवा झालेल्या माता भगिनींना आर्थिक मदत मिळणेसाठी उपरोक्त योजनांमधील जाचक अटी रद्द करून कोरोना काळात मृत्यू पावलेल्या सर्व मृत व्यक्तींच्या वारसांना मदत करावी

तसेच कोरोनामुळे विधवा झालेल्या माता भगिनींसाठी शासनाने स्वतंत्र अशी विशेष अर्थसहाय्य योजना अमलात आणावी विनंती आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब भिमराज ढुस यांनी मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे साहेब यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24