अहमदनगर Live24 टीम, , 01 फेब्रुवारी 2022 :- राज्य सरकारने सुपरमार्केट मध्ये वाईन विक्रीबाबतच निर्णय घेतल्यानंतर आताही त्याच्यावर टीका होत आहे, भाजपापाठोपाठ आता एमआयएम कडून देखील या निर्णयावर आक्षेप नोंदवण्यात आला आहे.
नुकतेच एमआयएम खासदार इम्तियाज जलील यावरून संतप्त झालेले पाहायला मिळाले आहे. औरंगाबादेतील एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी सुपरमार्केटमध्ये वाईन विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
सुपरमार्केटमध्ये वाईनच्या परवानगीनंतर आता एमआयएमने सुपरमार्केट फोडण्याचा इशारा दिला आहे. इतकेच नाही तर ठाकरे सरकारला खुले आव्हानही दिले आहे.
किराणा दुकान आणि सुपरमार्केटमध्ये सुरू होणाऱ्या वाईन शॉपला आपण फोडणार असल्याचा थेट इशारा त्यांनी दिला आहे.
औरंगाबादच्या सुभेदारी विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना जलील म्हणाले की, आमची स्पष्ट भूमिका आहे की, सरकारने वाईनची दुकान उघडून दाखवावी आम्ही ती फोडणार, कारण समाजात एक नवीन प्रथा निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात जर असे होत असेल तर यापेक्षा वाईट गोष्ट काय असू शकते. त्यामुळे आम्ही हे खपवून घेणार नाही.
त्यामुळे जर तुम्ही वाईन दुकान उघडण्याचा निर्णय घेतला असेल तर आम्ही सुद्धा फोडण्याचा निर्णय घेतला आहे. असे खासदार जलील म्हणाले. तुम्हाला माझ्यावर काय गुन्हे दाखल करायचे करा, पण आम्ही मागे हटणार नाही, असा थेट इशारा जलील यांनी दिला आहे.