एसटीची कोट्यवधींची मालमत्ता खाजगीकरणाच्या माध्यमातून घशात घालण्याचा सरकारचा डाव

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर – गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. वेळेवर वेतन मिळत नसल्याने कुटुंबाची घडी विस्कटत असताना ठाकरे सरकार मात्र संपकरी कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई करून त्यांच्यावर अन्याय करत आहे.

महामंडळास आणखी डबघाईस आणून एसटीची कोट्यवधींची मालमत्ता खाजगीकरणाच्या माध्यमातून घशात घालण्याचा सरकारचा डाव असून त्यासाठी कर्मचार्‍यास वेठीस धरून आत्महत्येस प्रवृत्त केले जात आहे.

त्यामुळे गरीब कर्मचार्‍यांच्या आत्महत्यांना सरकारच जबाबदार आहे, असा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी केला.

महामंडळाच्या बेपर्वाईमुळे वेळेवर पगारदेखील मिळत नसताना सेवा करणार्‍या कर्मचार्‍यांमध्ये नैराश्य पसरल्याने 30 हून अधिक कर्मचार्‍यांनी वेगवेगळ्या आगारांमध्येच आपले जीवन संपविले. मात्र ठाकरे सरकारने त्याची साधी दखलही घेतली नाही. उलट संप संपविण्यासाठी साम – दाम- दंड – भेद चा वापर करत आहे.

करोनासारख्या संकटकाळात जिवावर उदार होऊन एसटी कर्मचार्‍यांनी बजावलेल्या सेवेची राज्य सरकारने उपेक्षा केली आहे, अशी खंतही श्री. गोंदकर यांनी व्यक्त केली.

महामंडळाच्या आर्थिक बेशिस्तीचा फटका कर्मचार्‍यांना बसत असल्यामुळेच महामंडळाचे सरकारमध्ये विलीनकरण करावे आणि सरकारी कर्मचार्‍यांचे हक्क एसटी कर्मचार्‍यांना द्यावेत, अशी संपकरी कर्मचार्‍यांची मागणी आहे.

अहमदनगर लाईव्ह 24