अहमदनगर Live24 टीम, 28 ऑक्टोबर 2021 :- समाजसेवक अण्णा हजारे हे एक आदर्शवत महान व्यक्तित्व आहे. अण्णा हजारे यांनी राळेगणसिध्दीला रस्ता दाखविला.
आम्हाला दाखविला,आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही रस्ता दाखविला, असे सांगत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या कामाचे कौतुक केले.
नगरच्या दौऱ्यावर असताना कोश्यारी यांनी राळेगणसिध्दीस भेट देऊन हजारे यांनी राबविलेल्या विविध कामांची पाहणी केली. त्यानंतर ग्रामस्थांशी संवाद साधताना कोश्यारी यांनी हजारे यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.
दरम्यान यावेळी अण्णांनी महत्वाच्या तीन ग्रामविकासाला महत्वपूर्ण ठरलेल्या तीन प्रयोगांची माहिती राज्यपाल कोश्यारी यांना देत त्यावर राज्य आणि देश पातळीवर अमलबाजवणी गरजेची असल्याचे सांगितले.
सदोष नालाबंडीग ऐवजी शास्त्रशुद्ध नालाबंडीगची निर्मिती, दूध, फळ-भाजीपाला अशा पूरक शेती उद्योगांची निर्मिती आणि सोलर प्रकल्पाची गरज आणि सोलर ऊर्जानिर्मिती यावर सुरू असलेल्या कामांची माहिती दिली.
राज्यपाल कोश्यारी म्हणाले, ‘हजारे यांना प्रणाम म्हणजे प्रत्यक्ष ईश्वरालाच प्रणाम म्हणावा लागेल. अण्णांनी ग्रामस्थांना रस्ता दाखविला, आम्हाला दाखविला. हजारे यांनी सोलर प्रकल्प राबविला आहे.
हजारे यांनी राबविलेला हा सोलर प्रकल्प प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देशभर राबवित आहे. हजारे यांना अभिप्रेत अनेक योजना पंतप्रधान राबवित आहेत. संपूर्ण देशातील जनता राळेगणसिध्दीचे उदाहरण डोळ्यापुढे ठेवते आहे.
हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही ग्रामस्थ अतिशय चांगले काम करीत आहात. तुम्ही असेच काम करीत रहा. लवकरच उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनाही राळेगणसिध्दीला घेऊन येऊ. असे ते म्हणाले.