अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2021:- जामखेड तालुक्यातील खर्डा ग्रामपंचायतला आर.आर.(आबा)पाटील सुदर गाव योजनेतून प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे. खर्डा ग्रामपंचायतने मागील पाच वर्षाच्या काळात गावात राबविलेल्या विविध उपक्रमांची दखल घेत, शासनाच्या स्वच्छता कमिटीच्या एका पथकाने खर्डा गावास वेळोवेळी भेट देऊन पाहणी केली होती.
याबाबत सविस्तर असे की,जामखेड तालुक्यातून खर्डा ग्रामपंचायतने २०१९ – २० या वर्षाकरिता आर.आर(आबा) पाटील सुंदर गाव या योजनेत सहभाग घेतला होता. तत्कालिन सरपंच व सदस्यांनी मागील पाच वर्षात स्वच्छतेला प्राधान्य देऊन कचरा उचलण्यासाठी मोठी घंटागाडी घेऊन ग्रामपंचायतच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून गावात वेळोवेळी स्वच्छता मोहिम राबवत गावातील गटार दुरुस्ती व कचरा उचलण्याचे नियोजन केले होते.
त्यानंतर कोरोना काळात सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी परिसरात सॅनिटायझर फवारणी, नवीन गटार योजना राबवण्यासाठी प्रयत्न केले. खर्डा गाव व परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम केले.त्यानंतर याबाबत शासनाच्या स्वच्छता कमिटीचे पाहणी पथकाने खर्डा गावास वेळोवेळी भेट देऊन पाहणी केली. त्यानुसार खर्डा गावास आरआर (आबा) सुंदर गाव योजनेतून तालुक्यातून प्रथम क्रमांकाचे दहा लाख रुपयांचे बक्षीस मिळाले आहे.
पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते नूतन सरपंच नमिता आसाराम गोपाळघरे व उपसरपंच रंजना श्रीकांत लोखंडे यांना व ग्रामविकास अधिकारी प्रशांत सातपुते यांना हा पुरस्कार व सन्मानपत्रने गौरविण्यात येणार आहे.