अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे, नगर जिल्ह्यातील बारमाही शेतीचे भवितव्य अवलंबून असलेल्या मुळा, भंडारदरा व दारणा धरणसमूहात नव्या पाण्याची आवक सुरू झाली.
दारणा धरण निम्मे भरले. उर्वरित धरणांतील पाणीसाठे तीस टक्क्यांवर गेले. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर कालपासून मॉन्सूनचे आगमन झाले.
दारणा धरणाचा पाणीसाठा पन्नास टक्क्यांपर्यंत वाढला. पावसाचा जोर वाढल्यास आठवडाभरात हे धरण भरू शकते. मात्र, या धरणसमूहाच्या पाणलोट क्षेत्रात सर्वत्र सारखा पाऊस नाही. मुकणे धरणात २४ टक्के पाणीसाठा तयार झाला.
वाकी, भाम, भावली व वालदेवी या छोट्या धरणांचा पाणीसाठा लक्षात घेतला, तर या धरणसमूहाचा साठा तेहतीस टक्क्यांवर गेला आहे. पावसाने जोर न धरल्याने गंगापूर धरणसमूहाचा पाणीसाठा केवळ २६ टक्के आहे.
भंडारदरा व निळवंडे धरणांचे पाणलोट क्षेत्र असलेल्या घाटघर, पांजरे व रतनवाडी परिसरात काल सरासरी दीडशे मिलिमीटरपर्यंत पाऊस झाला. या दोन्ही धरणांत मिळून तीस टक्के, तर मुळा धरणात पंचवीस टक्के पाणीसाठा आहे.
या दोन्ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर आणखी वाढण्याची प्रतीक्षा कायम आहे. या सर्व धरणांत मागील वर्षीच्या तुलनेत तीस टक्के कमी पाऊस आहे