अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- कोरोना काळात जम्बो कोविड केअर सेंटरबाबत बालिश वक्तव्य व पत्रके काढुन राजकारणाची पातळी व मर्यादा ओलांडली गेली.
तालुक्यात कोरोनापेक्षाही घातक खालच्या दर्जाचे राजकारण करण्याच्या पारंपरिक व्हायरसला योग्य वेळी औषधोपचार करणार आहोत, असे असले तरी कोपरगाव तालुका पहिल्याच टप्प्यात अनलॉक झाल्याचे समाधान वाटत असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.
आमदार काळे यांनी पत्रकात म्हटले, की वाढत्या रुग्ण संख्येमुळे शासनाला शेवटचा पर्याय म्हणून नाईलाजास्तव लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागला, त्याचा दैनंदिन जीवनावर प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे परिणाम होऊन अर्थचक्र थांबले होते.
अशाही परिस्थितीत सर्व घटकांनी संयम दाखविला. कोपरगाव तालुक्यातील सर्व सामान्य नागरिक, छोटे-मोठे व्यापारी व व्यापारी असोसिएशन यांनी केलेल्या मोलाच्या सहकार्यातून जिल्ह्यासह कोपरगाव तालुका पहिल्याच टप्प्यात अनलॉक झाला आहे.
हे समाधान असले तरी यात अनेक स्वकीयांना आपण गमावले आहे. कोरोनातील आर्थिक नुकसान भविष्यात भरून येईलही, पण स्वकीयांना गमावल्याचे दु:ख आयुष्यात कधीही न विसरणारे आहे. तिसऱ्या लाटेसाठीदेखील आपण सज्ज आहोत; मात्र यासाठी सर्वांनी सजग रहावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.