अहमदनगर Live24 टीम, 16 सप्टेंबर 2021 :- रस्ता रुंदीकरणासाठी म्हणून मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ख्याती असलेले पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील बस्थानक प्रशासनाच्या वतीने जमीनदोस्त करण्यात आले आहे.

यामुळे येत्या काळात प्रवाशांची मोठी गैरसोय निर्माण होणार आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान पाथर्डी तालुक्यातील तिसगाव शहरातून पैठण, औरंगाबाद, पाथर्डी, मोहटादेवीमार्गे बीड, नांदेडकडे जाता येते.

मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणूनच तिसगावकडे पाहिले जाते. तिसगाव शहरातून जाणारा हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग झाल्याने इतर जिल्ह्यातून वर्दळ वाढली आहे. जवळपास ऊन, वारा पाऊस यांच्यापासून प्रवाशांना दिलासा मिळण्यासाठी निवारा म्हणून हे बसस्थानकच एकमेव आधार होते.

महामार्ग रूंदीकरण आवश्यकच आहे. प्रवासी निवारा अगोदर करून जुने बसस्थानक पाडायला हवे होते. श्री क्षेत्र मढी, मायंबा, वृद्धेश्वर, हनुमान टाकळी या देवस्थळी जाण्यासाठी तिसगाव शहरातून जावे लागते.

त्यामुळे भाविकांच्या निवाऱ्यासाठी महामार्ग विभागाने सोय करावी, अशी मागणी ग्रामपंचायतीकडून केली जाणार असल्याचे ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब लवांडे यांनी सांगितले.