अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2021:- गेल्या काही दिवसांपासून महसूलमंत्र्यांचा तालुका संगमनेर विविध विषयाने चर्चेत आहे. यातच शहरातील भिशी प्रकरण चांगलेच गाजत आहे. यातच एक नवीन माहिती समोर आली आहे.
भिशीत अडकलेले लाखो रुपये वसूल होत नसल्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणार्या एका भिशी चालकाविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील एका खाजगी रुग्णालयात अजिज याकूब मोमीन (वय 36) या हॉटेल व्यवसायीकाला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याने विषारी पदार्थ सेवन केल्याने उपचारासाठी त्याला दाखल करण्यात आले होते.
अजिज मोमीन याची 30 लोकांमध्ये भिशी चालू होती. भिशीमधील 30 पैकी सद्दाम मुनावर पठाण, रईस मनियार पेंटर अशा दोघांना इतर लोकांचे राहिलेले पैसे भरून टाका असे त्याने सांगितले होते.
यामुळे त्यांच्यात बाचाबाची झाली. यामुळे वैतागलेल्या मोमीन याने विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.
याबाबत पोलीस हेड कॉन्स्टेबल आयूब शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अजीज मोमीन याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.विषारी पदार्थ सेवन करण्यापूर्वी त्याने लिहीलेल्या चिठ्ठीत 14 जणांचा उल्लेख केला होता. पोलिसांनी यापैकी कुणावरही अद्याप कारवाई केलेली नाही.