अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- कोरोनामुळे देशभरात आरोग्य विभागावर मोठा ताण पडला आहे. यातच अनेक ठिकाणी अपुऱ्या वैद्यकीय सुविधांमुळे रुग्णांवर उपचार होत नाही व यामुळे रुग्णाचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याच्या घटनाही घडत आहे. यातच पारनेर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय हे सध्या समस्येच्या विळख्यात सापडले आहे.
पारनेर ग्रामीण रुग्णालयात एम.डी. डॉक्टर नाही म्हणून व्हेंटिलेटर सुविधा, सीटी स्कॅन, वैद्यकीय अधिकारी नाही, अशा आरोग्याच्या असुविधांनी रुग्णालय ग्रासले आहे. कोरोनाच्या महामारीच्या या भयंकर काळात अशी परिस्थिती हि रुग्णांसाठी जीवघेणी ठरू शकते. दरम्यान पारनेर मधील ग्रामीण रुग्णालयात अतिशय महत्त्वाचे असणारे एम.डी. शिक्षण असलेले वैद्यकीय अधिकारी २०१३ पासून उपलब्ध नाही.
केवळ एक ते दोन एमबीबीएस डॉक्टरवरच येथील ग्रामीण रुग्णालय अवलंबून आहे. गेल्या दोन वर्षांच्या कोरोना महामारीनंतर वैद्यकीय सुविधा उपलब्ध होतील, असे सर्वांना वाटत होते. मात्र, आरोग्य सुविधांची माहिती घेतल्यावर असुविधांची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
सध्या तेथे वैद्यकीय अधिकारी यांचीच वानवा आहे. त्यामुळे एका वैद्यकीय अधिकाऱ्यांवरच सगळा ताण पडत आहे. सीटी स्कॅन मशीनही उपलब्ध नाही, तर परिचारिका कमी आहे. इतर सुविधा नाही. यामुळे आजच्या परिस्थितीला वैद्यकीय सुविधांच्या अभावामुळे पारनेरच्या ग्रामीण रुग्णालयाचेच आरोग्य धोक्यात आल्याचे वास्तव चित्र दिसून येत आहे.
कोरोना महामारीचा संभाव्य धोका पाहता आरोग्य विभागाने या समस्यांकडे लक्ष देत याचे निरसन करणे गरजेचे बनू लागले आहे. अशी जनभावना व्यक्त होत आहे. दरम्यान येत्या काळात येथील परिस्थिती सुधारते कि आहे तशीच राहणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.