अहमदनगर Live24 टीम, 10 सप्टेंबर 2021 :- कर्जत तालुक्यातील रेहेकुरी वन परिक्षेत्रात काळवीटाच्या शिकारासाठी काही शिकाऱ्यानी जाळे पसरविले होते. मात्र वनविभागाच्या सतर्कतेमुळे शिकाऱ्याचे प्रयत्न अयशस्वी झाले.
मात्र वनविभाग व पोलिसांच्या सतर्कतेमुळे शिकारी पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, कर्जत तालुक्यातील रेहेकुरी वन परिक्षेत्रात काही शिकाऱ्यांनी काळविटाच्या शिकारीसाठी जाळे (वाघर) लावले होते. वन कर्मचारी गस्तीवर असताना त्यांच्या लक्षात हा प्रकार आला.
कर्मचाऱ्यांना पाहून शिकारी पळून गेले. मात्र, घटनास्थळी वन विभागाने त्यांची एक दुचाकी, २ नायलाॅनचे मोठे जाळे, कोयते व इतर मुद्देमाल जप्त केला. दुचाकीच्या माहितीवरून एका आरोपीची माहिती मिळाली. त्याचे नाव ज्ञानेश्वर सुरेश काळे असून तो कुळधरण (ता. कर्जत) येथील आहे.
कर्जत पोलिसांच्या मदतीने आरोपीला ताब्यात घेण्यात अखेर यश मिळाले. या आरोपीच्या उर्वरित साथीदारांचीही माहिती मिळाली असून सर्व रेहेकुरी व कुळधरण परिसरातील असून त्यांचा शोध सुरू आहे. अटक आरोपीला १४ सप्टेंबरपर्यंत वन कोठडी मिळाली आहे.