अहमदनगर Live24 टीम, 13 मे 2021 :- साता जन्माची साथ देण्याच्या शपथा खात आयुष्यभर एकमेकांना साथ देण्यासाठी पती – पत्नी लग्नबेडीत अडकतात. सुखा दुःखात एकमेकांचे साथीदार असलेलं हे नातंच काहीस वेगळं असत.
मात्र जामखेड तालुक्यात पती -पत्नीच्या एका धक्कादायक प्रकारामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. पत्नीपाठोपाठ पतीने ही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना जामखेड शहरात घडली. विशेष म्हणजे या दाम्पत्याचा चार महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता.
अजय कचरदास जाधव (वय ३२), शिल्पा अजय जाधव (वय २८, दोघेही रा. बीड रस्ता, जामखेड शहर) अशी आत्महत्या केलेल्या पती-पत्नीची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि, वरील दोघांचे हि चार महिन्यापूर्वीच लग्न झाले होते. शिल्पा जाधव हिने बुधवारी दुपारी बीड रस्त्याजवळील आदित्य गार्डन शेजारी राहत असलेल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
याबाबतची माहिती तिचा पती अजय जाधव यास समजली. त्यानंतर काही वेळातच अजय यानेही शहरातीलच मोरे वस्ती जवळील एका ठिकाणी आत्महत्या केली. या दोघांनी आत्महत्या का केली? याचे कारण समजू शकले नाही.
यानंतर दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आले. मयताचा भाऊ अभिषेक कचरदास जाधव याने जामखेड पोलीस ठाण्यात या घटनेची खबर दिली.