अहमदनगर Live24 टीम, 17 ऑगस्ट 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील अल्पवयीन मुलीचा शोध न लागल्याच्या निषेधार्थ शिवप्रहार संघटनेने पुकारलेल्या बंदला श्रीरामपूर व बेलापूरात प्रतिसाद मिळाला.
अल्पवयीन मुलीचा पोलिसांना ठावठिकाणा लागलेला नाही. रस्ता रोको केला तरीही पोलिसांना त्या अल्पवयीन मुलीस फुस लावणाऱ्यास पकडता आलेले नाही.
या घटनेच्या निषेधार्थ शिवप्रहार संघटनेतर्फे सोमवारी श्रीरामपूरसह बेलापूर बंदचे आवाहन केले होते. या आवाहनाला सर्व व्यापारी नागरिकांनी प्रतिसाद दिला बंदमुळे शहरातील मुख्य बाजारपेठेसह बेलापूर गावातील दुकाने आज दिवसभर बंद होती. या घटनेसंदर्भात हिंदुत्ववादी संघटनांनी पोलिस ठाण्यासमोर मोर्चा व बेलापुरात रास्ता रोको आंदोलन केले होते.
त्यानंतर आज पुन्हा ‘बंद’ पाळण्यात आला. एका तरुणाने अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना घडली. याला सुमारे २० दिवस उलटूनही पोलिसांना आरोपीचा तपास लागत नसल्याच्या निषेधार्थ शिवप्रहार प्रतिष्ठानच्या नेतृत्वाखाली आज बंद पाळण्यात आला.
आज सकाळपासून शहरातील मेन रोड, शिवाजी रोड, नेवासे रोड, तसेच संगमनेर रस्त्यावरील दुकाने बंद होती. शहरातील मेन रोडवरील मुख्य बाजारपेठेसह सोनार लेनमधील दुकाने बंद होती.
अपर पोलिस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजय सानप यांच्या पथकाने श्रीरामपूरसह बेलापुरात बंदोबस्त ठेवला होता.
सोमवारपासून शासनाने वेळेची मर्यादा वाढवली असली तरी घडलेली घटना दुर्दैवी असल्यामुळे सर्वानी दुकाने बंद ठेवून या घटनेचा निषेध नोंदवला. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.