अहमदनगर लाईव्ह 24 टीम / लंडन : संशोधकांच्या एका पथकाने मानवी यकृताला (लिव्हर) शरीराबाहेर तब्बल आठवडाभरापर्यंत जिवंत ठेवण्यास मदत करणाऱ्या एका अफलातून उपकरणाचा शोध लावला आहे. या यंत्राच्या साहाय्याने प्रत्यारोपणासाठी उपलब्ध असणाऱ्या यकृतांची संख्या वाढून त्यासंबंधित उपचारांत क्रांतिकारी बदल होण्याची शक्यता आहे.
‘द लिव्हर फोर लाईफ’ नामक ही मशीन स्वित्झर्लंडच्या संशोधकांनी विकसित केली आहे. या मशीनच्या मदतीने लिव्हर शरीराबाहेर आठवडाभरापर्यंत जिवंत ठेवण्यास मदत होणार आहे. हे यंत्र ‘परफ्युजन प्रणाली’वर चालते. ते यकृताच्या नैसर्गिक कामांचे नकल करते. म्हणजे हे यंत्र यकृताला शरीराबाहेरही मानवी शरीरासारखेच रक्ताभिसरण, रक्त शुद्धीकरण व रक्त प्रवाह सुरळीत ठेवण्यास मदत करते.
सद्य:स्थितीत बर्फाच्या साहाय्याने लिव्हर अवघ्या २४ तासांपर्यंत सुखरूप ठेवता येते. त्यामुळे हा शोध अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. ‘या प्रणालीद्वारे यकृत शरीराबाहेर केवळ सुखरूपच राहणार नाही, तर जखमी अवयवांची प्रयोगशाळेत दुरुस्ती किंवा त्यांची नव्याने वाढही करता येणार आहे.
विशेषत: यकृताशी संबंधित आजार किंवा यकृताचा कर्करोग असणाऱ्या रुग्णांनाही याचा मोठा लाभ होणार आहे.’ ‘नेचर बायोटेक्नॉलॉजी’ नियतकालिकात हा शोधनिबंध प्रकाशित झाला आहे. ‘विख्यात सर्जन, जीवशास्त्रज्ञ व अभियंत्यांच्या एका समूहाच्या ४ वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर तयार झालेल्या या अनोख्या परफ्युजन प्रणालीमुळे प्रत्यारोपण क्षेत्रात नव्या संशोधनाचे मार्ग मोकळे झालेत,’ असे ‘ईटीएच ज्यूरिख’चे सहलेखक प्रोफेसर पियरे ॲलेन क्लॅव्हेंन यांनी याविषयी बोलताना म्हटले आहे.
२०१५ मध्ये या संशोधनाला सुरुवात झाली तेव्हा काही वैज्ञानिकांनी मशीनच्या मदतीने यकृताला अवघ्या १२ तासांपर्यंत जिवंत ठेवता येईल, असा दावा केला होता; पण या संशोधनामुळे हा दावा फोल ठरला आहे.