अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:- श्रीरामपूर शहरातील रहिवासी बेलापूरचे बेपत्ता झालेले व्यापारी गौतम हिरण यांच्या तपासाला गती मिळावी म्हणून महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री ना.अनिल देशमुख यांना निवेदन देण्यात आले आहे.
बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण बेपत्ता होऊन आतापर्यंत पाच दिवस झाले तरीही पोलीसांना त्यांचा ठावठिकाणा लागेना. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी शनिवार दिनांक 6 मार्च रोजी गाव बंदची हाक दिली आहे.
तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधान सभेत हा मुद्दा उपस्थित केला त्यामुळे जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील हे सायंकाळी आपल्या फौज फाट्यासह बेलापुरात दाखल झाले व तपासाची चक्रे फिरवली.
दरम्यान हिरण यांच्या तपास यंत्रणेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वतः लक्ष घातल्यास तपास जलदगतीने होईल अशी अपेक्षा केतन खोरे यांनी व्यक्त केली.
अधिवेशनाचा कालावधी असल्याने रात्री उशिराने झालेल्या या भेटीनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बेपत्ता व्यापारी गौतम हिरण प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना तात्काळ संपर्क साधला. हिरण प्रकरणाचा जलदगतीने तपास करण्याची सूचना देत वेळोवेळी आपल्याला माहिती देण्याचे सांगितले.