अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:- गेल्या वर्षभरापासून रखडलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोल्यांचा विषय अखेर मार्गी लागला आहे. जिल्ह्यात नव्याने 316 तर जुन्या 309 शाळा खोल्यांच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे.
यात नवी खोल्यांसाठी 28 तर दुरूस्तीसाठी 3 कोटी अशा 31 कोटींच्या निधीचा समावेश आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या साडेतीन हजार शाळा आहेत. मात्र त्यातील अनेक शाळा खोल्यांची पडझड झाली आहे.
निंबोडी येथील दुर्घटनेनंतर शाळा खोल्या दुरुस्ती तसेच नवीन खोल्या बांधकामाचा विषय ऐरणीवर आला. त्यानुसार मोडकळीस आलेल्या शाळा खोल्यांचे निर्लेखन करण्यात आले. जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्हा नियोजनमधून त्यासाठी निधी मागितला.
पालकमंत्र्यांनी त्याला मंजुरी देत तब्बल 28 कोटींचा निधी मंजूर केला. जिल्ह्यात सध्या 930 शाळा खोल्यांची गरज असून त्यापैकी 316 शाळांना चालू आर्थिक वर्षात प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी 28 कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे.
याशिवाय 309 शाळा खोल्यांची दुरुस्तीही विचारात घेतली असून त्या दुरुस्तीलाही प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यासाठी वेगळी तीन कोटीची तरतूद आहे. 31 मार्च 2022 पर्यंत या खोल्यासाठी मंजूर निधी खर्च करायचा आहे.