अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :- लायन्स क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने मागील तीन वर्षात लावण्यात आलेल्या दोन हजार झाडांपैकी सोळाशे झाडे जगविण्यात आली असून, त्यांचा वाढदिवस वृक्षरोपणाने साजरा करण्यात आला. यावेळी लायन्सचे अध्यक्ष डॉ. अमित बडवे, खजिनदार विपुल शाह, प्रशांत मुनोत, दिलीप कुलकर्णी,
धनंजय भंडारे, सुमित लोढा, संदेश कटारिया, राजबीरसिंग संधू, रविकाका बडवे, मनोज देशमुख, विनोद देशमुख, झुंबरराव बोरुडे, राजेंद्र घोडके आदिंसह लायन्सचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. लायन्स क्लब ऑफ अहमदनगर सामाजिक कार्यासह पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावल आहे.
मागील तीन वर्षात मांडवगण (ता. श्रीगोंदा) येथील श्री सिद्धेश्वर मंदिराच्या तीस एकरच्या परिसरात लायन्सचे अध्यक्ष डॉ. अमित बडवे यांच्या पुढाकाराने दोन हजार झाडे लावण्यात आली होती. या झाडांच्या संवर्धनासाठी लायन्स क्लबने पाण्याची टाकी देऊन पाईपलाइन बसवून दिली आहे. या दोन हजार झाडांपैकी सोळाशे झाडे चांगल्या प्रकारे बहरली आहे. यामध्ये जांबुल, वड, पिंपळ, लिंब आदि देशी झाडांचा समावेश असून, सदर झाडे दहा ते बारा फुट उंचीचे झाले आहे.
लायन्सचे अध्यक्ष डॉ. अमित बडवे म्हणाले की, वृक्ष लावण्याबरोबर त्याला जगवणे महत्त्वाचे आहे. झाडे किती लावले त्यापेक्षा किती जगवले? याकडे पहाण्याची गरज आहे. पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षरोपणाशिवाय पर्याय नाही. पर्यावरण संवर्धनात दिलेले योगदान ही समाजसेवाच आहे.
लायन्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करुन उजाड माळरान, डोंगर रांगा हिरवाईने फुलविण्यात येणार असल्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. धनंजय भंडारे म्हणाले की, लावलेले झाड व जगवलेल्या झाडांचा ऑडिट झाला पाहिजे. पावसाळ्यात फक्त वृक्षरोपण करुन चालणार नसून, लावलेली झाडे जगविण्यासाठी वर्षभराचे नियोजन आवश्यक आहे.
लायन्स क्लब पर्यावरण संवर्धनासाठी योगदान देत असून, कोरोनाच्या बिकट परिस्थितीमध्ये ऑक्सिजनचे महत्त्व सर्वांना कळले आहे. ऑक्सिजन निर्मितीसाठी वृक्ष हे एकमेव माध्यम असून, त्यादृष्टीने वृक्षरोपण व संवर्धनाच्या मोहिमेत प्रत्येकाने योगदान देण्याचे त्यांनी आवाहन केले.
लायन्स क्लबने श्री सिद्धेश्वर मंदिराच्या परिसरात लावलेल्या झाडांमुळे मंदिर परिसर हिरावाईने नटले असून, येणार्या भाविकांना देखील निसर्गाचा आनंद मिळत आहे. या उपक्रमाबद्दल मांडवगण ग्रामस्थांनी लायन्स क्लबचे आभार मानले.