अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2021 :- आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेवरून संसदेत भारतीय जनता पक्ष उघडा पडला असून, मराठा समाजाला वस्तुस्थिती लक्षात आली आहे.
त्यामुळे खा. संभाजीराजे यांच्या आडून भाजप ‘डॅमेज कंट्रोल’चा प्रयत्न करीत असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. नांदेड येथील आंदोलनाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना ते बोलत होते.
खा. संभाजीराजे मराठा समाजासाठी प्रामाणिकपणे काम करणारे भाजपमधील एकमेव नेते आहेत. त्यांच्याबद्ल मला नितांत आदर आहे. त्यामुळे त्यांनी माझ्यावर केलेल्या वैयक्तिक टीकेला मी उत्तर देणार नाही. परंतु, भाजप त्यांचा गैरवापर करते आहे. नांदेडमधील आंदोलन हे भाजपप्रणीत होते, याची कदाचित त्यांना कल्पना नसावी.
या आंदोलनासाठी भाजपचे कार्यकर्ते गोळा करण्यात आले होते. बहुतांश मराठा संघटना आजच्या आंदोलनात सहभागी झाल्या नव्हत्या, असे चव्हाण यांनी या वेळी सांगितले. मराठा समाजातील उमेदवारांना ईडब्ल्यूएस व खुल्या प्रवर्गाचा पर्याय देताना जात पडताळणी प्रमाणपत्र मागण्यात आल्याचा खा. संभाजीराजे यांचा दावा चव्हाण यांनी फेटाळून लावला.
पात्र मराठा उमेदवारांना केवळ ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र मागण्यात आले आहे. सदर उमेदवारांना हे प्रमाणपत्र देण्यासाठी राज्य सरकारने शासन निर्णयही जारी केला आहे. मराठा समाजातील उमेदवारांना जात पडताळणी प्रमाणपत्र मागितले असेल तर तशी माहिती द्यावी; त्या अधिकाऱ्यांविरुद्ध तातडीने कारवाई केली जाईल, असा शब्द त्यांनी दिला.