अहमदनगर Live24 टीम, 12 सप्टेंबर 2021 :- बाजार समितीवर महाविकास आघाडीचे जे लोक भ्रष्टाचार झाला म्हणून टीका करत आहेत. त्या लोकांनी स्वतः च्या नेत्यांना, पक्षाला आणि कार्यकर्त्यांना फसवले आहे. त्यांच्याच पक्षातून त्यांना विरोध सुरू झाला आहे.
त्यांचे चांगुलपणाचे बुरखे फाटल्याने स्वतः चे नाकर्तेपणा आणि विश्वासघातकीपणा झाकण्यासाठी आणि लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी ते बाजार समितीवर भ्रष्टाचाराचे आरोप करत असल्याची टीका बाजार समिती पदाधिकाऱ्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली.
बाजार समितीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेला सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के, हरिभाऊ कर्डिले, विलास शिंदे, बाळासाहेब निमसे, बन्सी कराळे, बाबासाहेब खर्से, दिलीप भालसिंग, बबन आव्हाड, बाळासाहेब जाधव, संतोष कुलट, उद्धव कांबळे, भैरू कोतकर,वसंत सोनवणे आदी उपस्थित होते. सभापती घिगे म्हणाले, महाआघाडीतील जे लोक बाजार समितीवर आरोप करत आहेत.
त्यांची विश्वासार्हता काय आहे. संदेश कार्ले यांनी स्वतःच्या स्वार्थापोटी जिल्हा परिषद विषय समिती पदासाठी त्यांनी प्रा. गाडे यांचा आदेश मानला नाही. त्यांना जिल्हा प्रमुख आणि आमदार होण्याची घाई झाली आहे. ते संपर्क प्रमुखांशी संधान साधून आहेत. आपल्यापेक्षा कोणी मोठा होऊ नये यासाठी त्यांनी त्यांच्याच पक्षातील अनेकांचे खच्चीकरण केले. पक्षात हुकूमशाही करतात असे शिवसैनिक आम्हाला सांगतात.
विधान परिषदेवेळी पक्षाशी नेत्यांशी गद्दारी करत कितीची पाकिटे घेतली आणि मतदान कोठे केले हे सांगितल्यास जनता यांना दारात उभी करणार नाही. बाळासाहेब हराळ प्रत्येक निवडणुकीत आपला नेता बदलतात. ज्या दादा पाटलांनी जीवाचे रान करत हराळांना निवडून आणले, पण मतमोजणीच्या रात्रीच ते विखे पाटलांच्या गटात सामील झाले. विधानसभा आणि विधान परिषदेत त्यांनी प्रा. गाडे यांना मतदान केले का ?
हे शपथ घेऊन सांगावे. ते कोणत्या पक्षात आहेत आणि त्यांचा नेता कोण हे त्यांनाच सांगता येणार नाही. गोविंद मोकाटे यांना मानसोपचार तज्ञाची गरज आहे. महाआघाडीच्या सर्व नेते ठेकेदारी करतात आणि जनतेच्या हिताचा आव आणतात.
अनेक जण छुप्या पध्दतीने माजी मंत्री यांच्याशी येऊन भेटतात आघाडीच्या या नेत्यांचा खरा चेहरा, कार्यकर्त्यांना आणि लोकांना समजला आहे. त्यांचेच कार्यकर्ते आमचा फक्त निवडणुकी पुरता वापर केला गेला उघडपणे बोलू लागले आहेत. त्यांच्याच पक्षातून त्यांना विरोध होत आहे.
विश्वासघातकीपणा झाकण्यासाठी आणि लोकांचे लक्ष दुसरी कडे वळवण्यासाठी बाजार समितीला बदनाम करत आहेत. दुसरे नेतृत्व तयार होऊ नये म्हणून मागील बाजार समिती आणि तालुका खरेदी विक्री संघ निवडणुकीत महाआघाडीचा पॅनल यांनीच पडला.