अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :- आपण करत असलेल्या चोरीचे बिंग फुटू नये म्हणूनच एका अल्पवयीन मुलाने ११ वर्षीय मुलाची गळा चिरून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
शेवगाव तालुकातील खुंटेफळ येथे सोमवार १० मे रोजी ही घटना घडली होती. पोलिसांनी अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे. दरम्यान सार्थक अंबादास शेळके (वय-11) असे मयत मुलाचे नाव आहे.
तर याबाबत अधिक माहिती अशी कि, घटनेच्या दिवशी सार्थकचे वडील अंबादास शेळके कुटुंबासमवेत घराबाहेर काम करत होते. सार्थक आणि त्याचा लहान भाऊही त्यांच्यासोबत होता.
घरापासून काही अंतरावर असलेल्या वाडग्यात नवीन घराचे काम सुरू होते. दुपारी सार्थक घरी गेला. मात्र, बराच वेळ झाला तरी तो परत आला नाही.
त्यामुळे त्याच्या लहान भावाला काय झाले ते पहाण्यासासाठी पाठविले. त्याने घरी जाऊन पाहिले असता सार्थक रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. त्याच्या मानेवर वार केलेला दिसून आला.
शेळके यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने सार्थकला रुग्णलयात नेले. मात्र, त्यापूर्वीच तो मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अंबादास शेळके यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला.
मात्र, ही हत्या कोणी व कशासाठी केली याचे गूढ उकलत नव्हते. शेवटी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना हे गूढ उकलण्यात यश आले. गावातीलच एका अल्पवयीन मुलाने ही हत्या केल्याचे उघडकीस आले. हा मुलगा शेळके यांच्या घरात चोरी करण्यासाठी गेला होता.
सगळे घराबाहेर आहेत, कोणीच येणार नाही, असे त्याला वाटले. मात्र, सार्थक तेथे आला आणि त्याची चोरी पकडली गेली. आपले बिंग फुटू नये यासाठी सार्थकची हत्या केली, अशी कबुली त्या मुलाने पोलिसांकडे दिली आहे.